टी-२० विश्वचषकात भारताचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला (रविवार) पाकिस्तानशी होणार आहे. या मॅचमध्ये अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी हाय-व्होल्टेज मॅचबाबत अंदाज वर्तवला असून आता या यादीत महान फलंदाज गौतम गंभीरचे नावही जोडले गेले आहे. गौतम गंभीरने भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवणे भारतीय संघासाठी धोकादायक ठरू शकते, असे त्याचे मत आहे.
गौतम गंभीरने झी न्यूजशी बोलताना आपले वक्तव्य केले. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकबद्दल बोलताना तो म्हणाला, ”माझ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर, हार्दिक सहाव्या क्रमांकावर आणि अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर येईल. पण सराव सामन्यात आपण दिनेश कार्तिकला खेळताना पाहिले. परंतु केवळ १० चेंडू खेळण्यासाठी खेळाडूची निवड करू नये.”
दिग्गज क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “तुम्हाला एक खेळाडू निवडायचा आहे, जेणेकरून तो ५ किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल, परंतु दिनेश कार्तिकने असा हेतू दर्शविला नाही. शेवटच्या २-३ षटकांमध्येच तो फलंदाजी करेल आणि ऑस्ट्रेलियात ते धोकादायक ठरू शकते, असा इरादा त्याने आणि संघ व्यवस्थापनाने दाखवला आहे. तिथे तुम्ही लवकर विकेट गमावल्यास, तुम्हाला अक्षर पटेलला लवकर पाठवावे लागेल. कारण तुम्हाला हार्दिकला लवकर पाठवायचे नाही. म्हणूनच मी ऋषभ पंतला माझ्या संघात घेतले आहे.”
भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यापूर्वी, माजी स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध त्याच्या आवडत्या भारतीय प्लेइंग इलेव्हनची देखील निवड केली आहे. त्याने आपल्या संघात पाच फलंदाज, दोन अष्टपैलू, तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज निवडले आहेत. गौतम गंभीरच्या संघात दिनेश कार्तिकच्या नावाचा समावेश नाही.
गौतम गंभीरची भारतीय प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग/भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.