Glenn Maxwell’s wicket was the turning point in AFG vs AUS match : टी-२० विश्वचषक २०२४ चा ४८ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात रशीद खानच्या अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी मात करत इतिहास रचला. त्याचबरोबर २०२३ च्या वनडे विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. एके काळी ऑस्ट्रेलियासाठी जिंकेल असे वाटत असताना गुलबदिन नईबने एकट्याने फिरवला. मात्र, या सामन्याचा खरा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे ग्लेन मॅक्सवेलचा नूर अहमदने पकडलेला झेल. गुलबदिन नईबच्या षटकात नूर अहमदने उत्कृष्ट झेल घेत मॅक्सवेलची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी संपुष्टात आणली, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ग्लेन मॅक्सवेलचा कॅच ठरला सामन्याच्या टर्निंग पॉइंट –
या सामन्यात जोपर्यंत ग्लेन मॅक्सवेल खेळपट्टीवर ठाण मांडून होता, तोपर्यंत अफगाणिस्तान संघ विजय मिळवू शकेल, असे कोणालाच वाटत नव्हते. मात्र ऑस्ट्रेलियाला १५ व्या षटकात १०६ धावांवर सहावा धक्का ग्लेन मॅक्सवेलच्या रुपाने मोठा धक्का बसला. ग्लेन मॅक्सवेल ४१ चेंडूत ५९ धावा करून बाद झाला. गुलबदिन नईबने त्याला नूरकरवी झेलबाद केले. अफगाणिस्तान संघासाठी या सामन्यात गुलबदिन नईबने लक्षवेधक कामगिरी केली. या गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक फलंदाजांना एकामागून एक पॅव्हेलियनमध्ये परत पाठवण्यास सुरुवात केली. नायबने ४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. रहमानउल्ला गुरबाजने ६० आणि इब्राहिम झाद्रानने ५१ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ १९.२ षटकांत १२७ धावांवर गारद झाला. गुलबदिन नईबने चार विकेट्स घेतल्या. या सामन्यात एकेकाळी ऑस्ट्रेलियाने ३२ धावांवर तीन विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने मार्कस स्टॉइनिससोबत ३९ धावांची भागीदारी केली.
हेही वाचा – AUS vs AFG : अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय; गुलबदीन ठरला शिल्पकार
गुलबदिन नईबने स्टॉइनिसला बाद करून ही भागीदारी तोडली. इथून सामना बदलला. जेव्हा मॅक्सवेलने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ११ वे अर्धशतक झळकावले, तेव्हा त्याला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाची आठवण करून दिली, जेव्हा मॅक्सवेलने अफगाणिस्तानवर ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी अविश्वसनीय खेळी खेळली होते. असेच पुन्हा होईल असे वाटत होते, पण गुलबदिनने मॅक्सवेलला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या आशा निराशा केली.
हेही वाचा – IND vs BAN : रोहित शर्माने रचला इतिहास! ख्रिस गेलचा ‘हा’ षटकारांचा विक्रम मोडत ठरला नवा ‘सिक्सर किंग’
ग्लेन मॅक्सवेलचे अर्धशतक ठरले व्यर्थ –
ग्लेन मॅक्सवेल (५९) व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला १५ चा आकडा देखील स्पर्श करता आला नाही. ट्रॅव्हिस हेड (०), डेव्हिड वॉर्नर (३), कर्णधार मिचेल मार्श (१२), मार्कस स्टॉइनिस (११), टीम डेव्हिड (२), मॅथ्यू वेड (५), पॅट कमिन्स (३), ॲश्टन अगर (२) आणि ॲडम झाम्पा (९) विशेष काही करू शकला नाही. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे सुपर ८ गट १ मधील उपांत्य फेरी गाठण्याची लढाई रोमांचक झाली आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या दोघांचे प्रत्येकी दोन गुण झाले आहेत. ऑस्ट्रेलियाला आपला शेवटचा सुपर ८ सामना भारताविरुद्ध खेळायचा आहे तर अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध खेळायचे आहे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे. दोघेही हरले तर नेट रन रेटचा खेळ रंगेल.