Afganistan vs Bangladesh ICC T-20 World Cup : आयसीसी टी-२० वर्ल्डकच्या उपांत्य फेरीचे चित्र आता स्पष्ट झालेले आहे. भारत वि. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान असे उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. सुपर ८ मधील शेवटचा अफगाणिस्तान वि. बांगलादेश हा सामना सर्वाधिक रोमांचक ठरला. या सामन्याच्या निकालावर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांचे उपांत्य फेरीचे भवितव्य ठरले होते. या सामन्यात काही नाट्यमय घडामोडीही घडल्या. अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू गुलबदीन नईबला सामन्यात झालेली दुखापत चर्चेचा विषय ठरत आहे. अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी संथगतीने खेळ खेळण्याचा इशारा देताच गुलबदीन मैदानावर झोपला. त्यामुळे या घटनेबद्दल आता तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

या सामन्यात पावसाने वारंवार व्यत्यय आणला होता. अफगाणिस्तानने बांगलादेशला अवघ्या ११६ धावांचे लक्ष्य दिले होते. बांगलादेशने आक्रमक पद्धतीने धावांचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. मात्र त्यांनी आपले मुख्य फलंदाज गमावले. १२ व्या षटकात नूर अहमद गोलंदाजी करत असताना बांगलादेशने ८१ धावांवर ७ गडी गमावले होते. तेवढ्यात पावसाला सुरुवात झाली. डीएलएसनुसार बांगलादेश दोन धावांनी मागे होता. त्यामुळे पाऊस थांबला नसता तर अफगाणिस्तानने नियमानुसार उंपात्य फेरी गाठली असती.

AFG v BAN: ‘हळू खेळा, पाऊस येतोय’, अफगाणिस्तानच्या कोचचा इशारा आणि गुलबदीन पाय पकडून खाली पडला… पाहा VIDEO

मैदानात या नाट्यमय घडामोडी घडत असताना समालोचन करणाऱ्या सायमन डौल यांनी यावेळी म्हटले की, प्रशिक्षकाने संथ खेळण्याचा इशारा देताच पहिल्या स्लीपला उभा असलेला गुलबदीन नईब जमिनीवर कोसळला. हे अतिशय चुकीचे आहे. तर झिम्बाब्वेचे समालोचक पोमी एमबांगवा यांनी या प्रसंगाची खिल्ली उडवताना म्हटले की, या अभिनयासाठी ऑस्कर किंवा एमी पुरस्कार द्यावा का?

नईब मैदानात झोपल्यानंतर त्याला उपचार दिले गेले. तेवढ्यात पाऊस सुरू झाल्यामुळे नवीन-उल-हक आणि वैद्यकीय मदत करणाऱ्या सहकाऱ्यांच्या आधाराने गुलबदीन नईब तंबूत परतला. भारताचा फिरकीपटू आर. अश्विननेही या प्रसंगाची खिल्ली उडवणारी पोस्ट एक्सवर टाकली. ‘गुलबदीनला रेड कार्ड’, असे कॅप्शन लिहिले. या पोस्टला उत्तर देताना गुलबदीन नईबने म्हटले की, “कभी खुशी, कभी गम होता है… हॅमस्ट्रिंग” आणि या कॅप्शनपुढे हसण्याच्या इमोजी टाकून गुलबदीनने ही गोष्ट हसण्यावरी घेतली.

गुलबदीनवर कारवाई होणार?

आयसीसीच्या आचारसंहितेनुसार, वेळ वाया घालविणे हा कलम २.१०.७ नुसार १ किंवा २ स्तरावरचा गुन्हा मानला जातो. स्तर १ च्या गुन्ह्यासाठी मॅच फी मधील १०० टक्के दंड आणि दोन निलंबन पाईंट्स दिले जातात. जर एका वर्षात एखाद्या खेळाडूला चार निलंबन पाईंट्स मिळाले तर त्याला एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा टी-२० सामन्याची बंदी घालण्यात येते.

याशिवाय, टी-२० साठी आयसीसीने कलम ४१.९ नुसारही नियम केले आहेत. गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षकाने वेळ वाया घालविला तर अम्पायरकडून पाच धावांच्या दंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. अम्पायरला असा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात असा निर्णय घेण्यात आला नाही.