IND vs ENG Harbhajan Singh Slams Vaughan: भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉनला भारताच्या विजयानंतर अजिबात दया न दाखवता सडेतोड उत्तर दिलं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार वॉनने टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी ठिकाण व वेळ निवडताना भारताला झुकतं माप दिल्याचा आरोप काल भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्याआधीच केला होता. आयसीसीवर ताशेरे ओढताना वॉनने संपूर्ण स्पर्धा ही न्यायकारक असायला हवी होती असेही म्हटले होते. भारतीय दर्शकांची संख्या विचारात घेऊन आयसीसीने सुपर आठ सामन्यातील स्थान न लक्षात घेता भारताच्या सोयीने गयाना येथे सामना खेळवला. भारताचे इतरही सामने हे दिवसाच्या वेळी खेळवलेले होते आणि बाकी संघांना मात्र रात्रीचे सामने खेळावे लागले अशी टीकाही वॉनने केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकंच नव्हे तर, भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीतील सामन्याच्या वेळीही भारत आणि आयसीसीवर वॉनने अप्रत्यक्षपणे टीका केली. भारत अंतिम फेरीत जाणार आहे हे स्पष्ट झाल्यानंतर, वॉन म्हणाला की, “स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून भारत अंतिम फेरीत जाण्यासाठी नक्कीच पात्र आहे. संथ व फिरकीसाठी साजेश्या पीचवर भारत चांगली कामगिरी करतोच, इंग्लंडसाठी मात्र अशी खेळपट्टी आव्हानात्मक ठरते.” भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात रोहित शर्माच्या शिलेदारांनी बाजी मारल्यावर या खोचक टीकांवर उत्तर देत हरभजनने वॉनची कानउघडणी केली आहे.

हरभजनने पोस्टमधून उत्तर देताना, वॉनचा दावा ‘मूर्खपणाचा’ असल्याचे म्हणत “मूर्खासारखं बोलणं थांबवा” असा सल्ला दिला. भज्जीने लिहिले की, “गयानामधील खेळपट्टी भारतासाठी चांगली आहे हे तुम्ही कशाच्या आधारे बोलताय? दोन्ही संघ एकाच पीचवर खेळले, इंग्लंडने नाणेफेकही जिंकली होती, उलट हा त्यांच्यासाठी मोठा फायदा होता. हे मूर्खासारखं बोलणं, वागणं थांबवा. भारताने इंग्लंडला फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्ये हरवलं आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ती स्वीकारून जरा पुढे जा. तुमचा हा कचरा तुमच्याकडेच ठेवा आणि थोडं लॉजिकल बोला. “

हरभजन सिंग भडकला; म्हणाला, वॉनचा दावा म्हणजे ‘मूर्खपणाचा’

भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे हायलाईट्स (IND vs ENG Highlights)

गयानामधील पीच दिवसाच्या खेळांसाठी संथ असल्याचे म्हटले जाते आणि असं असूनही नाणेफेक जिंकल्यावर इंग्लंडचा कर्णधार बटलरने आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नवीन चेंडू आणि पावसामुळे पीचवर आलेली आर्द्रता असं कॉम्बिनेशन फायद्याचं ठरेल असं कदाचित बटलरला वाटलं असावं पण असं काहीच झालं नाही. पावसाने इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना अजिबात मदत केली नाही आणि पॉवरप्लेमध्ये इंग्लंडला केवळ विराट कोहली व ऋषभ पंत अशा दोनच विकेट काढता आल्या.

हे ही वाचा<< “विश्वचषक भारतासाठीच, बाकीच्यांवर अन्याय”, मुंबईत राहणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा ‘या’ मुद्द्यावरून ICC वर मोठा आरोप

सामन्यात हळूहळू फिरकीपटूंसाठी खेळपट्टी अधिक अनुकूल असल्याचे दिसून आले. हे लक्षात आल्यावर इंग्लंडच्या सीमर्सने कटर आणि बॅक-ऑफ-द-हँड गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत जम बसलेल्या भारतीय फलंदाजांनी बाजी मारली. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची शानदार भागीदारी करून भारताची धावसंख्या वाढवली.

रोहितने ३९ चेंडूत ५७, सूर्याने ३६ चेंडूत ४७, हार्दिक पंड्या (१३ चेंडूत २३) आणि रवींद्र जडेजा (९ चेंडूत १७) आणि अखेरीस अक्षर पटेलने सुद्धा १० धावांची जोड करत टीम इंडियाची धावसंख्या १७१ वर नेऊन ठेवली.

हे ही वाचा<< “स्वतःला अडचणीत आणायचं नाही पण..”, अफगाणिस्तान उपांत्य फेरीतून बाद होताच प्रशिक्षक ICC वर भडकले; म्हणाले, “पीच पूर्णपणे..”

दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचे डावखुरे फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी अनुक्रमे २३ व १९ धावा देत प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. १०३ धावांवर इंग्लंडला ऑल आउट करून भारताने ६८ धावांच्या फरकाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी विश्वचषक विजेतेपदासाठी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा सामना होणार आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh brutally slams england ex captain michael vaughan says keep your rubbish to yourself after ind vs eng highlights post svs