Harbhajan Singh’s Warning To Team India : टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सुपर 8 मधील पहिला सामना २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने रोहित शर्मा अँड कंपनीला इशारा दिला आहे. हरभजन सिंगच्या मते, अफगाण संघाला कमी लेखण्याची चूक टीम इंडियाला महागात पडू शकते. भारताने अ गटातील सर्व सामने जिंकले आणि सुपर ८ चे तिकीट मिळवले आहे. भारतीय संघाने आतापर्यंतचे सर्व सामने जिंकले असले, तरी वेस्ट इंडिजची परिस्थिती अमेरिकेपेक्षा वेगळी आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते आधी खेळपट्टी समजून घेणे.
हरभजन सिंगने टीम इंडियाला केले सतर्क –
हरभजन सिंगने टीम इंडियाला सतर्क करताना म्हणाला की, “तो (अफगाणिस्तान) खूप चांगला संघ आहे. आपण पाहिलेला आलेख दाखवतो की अफगाणिस्तानने फार कमी कालावधीत बरीच प्रगती केली आहे. त्यांच्याकडे रशीद खान आणि नबी आहेत. त्यांचे फिरकीपटू कदाचित या स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज आहेत. त्याचबरोबर त्यांची फलंदाजी देखील दमदार आहे. ते केवळ फ्लिक शॉट्स खेळत नाही किंवा निष्काळजीपणे शॉट्स खेळून आऊट होत नाहीत. आता एकदिवसीय विश्वचषक खेळल्यानंतर त्याच्याकडे अनुभव आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा जवळपास पराभव केला होता.”
मोठ्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला कमी लेखू नये –
विशेषत: मोठ्या सामन्यांमध्ये अफगाणिस्तानला कमी लेखू नये, असे हरभजन म्हणाला. तो पुढे म्हणाला, “या संघात ताकद आहे आणि ते कोणत्याही मोठ्या संघाला पराभूत करू शकतात. त्यामुळे जेव्हा ते भारताविरुद्ध खेळतात तेव्हा त्यांना कमी लेखले जाऊ नये. कारण त्यांनी नाणेफेक जिंकली आणि काही गोष्टी त्यांच्या बाजूने गेल्या तर ते भारतासाठी आव्हानात्मक ठरु शकते.” अफगाणिस्तान संघ मोठे उलटफेर करण्यात पटाईत आहेत. कारण त्यांनी याच्याआधी असे पराक्रम केले आहेत.
टी-२० विश्वचषकातील टीम इंडियाचे सुपर ८ फेरीतील वेळापत्रक –
२० जून २०२४: अफगाणिस्तान विरुद्ध भारत: केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन, बार्बाडोस: रात्री ८ वाजता
२२ जून २०२४: भारत विरुद्ध बांगलादेश: सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियम, नॉर्थ साउंड, अँटिग्वा रात्री ८ वाजता
२४ जून २०२४: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत: डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, ग्रोस आयलेट, सेंट लुसिया: रात्री ८ वाजता
टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान