‘गेले सहा महिने हार्दिकसाठी अतिशय कठीण होते. त्याला वाट्टेल ते बोललं गेलं. त्याच्या मनाचा कोणीही विचार केला नाही, याचं मला अतिशय वाईट वाटलं’, अशा शब्दात हार्दिक पंड्याचा भाऊ कृणाल पंड्याने भावुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. वर्ल्डकपविजेता भारतीय संघ मायदेशी परतला. दिल्लीत पंतप्रधानांनी संघाची भेट घेतली. त्यानंतर मुंबईत नरिमन पॉइंट परिसरात व्हिक्टरी परेड काढण्यात आली. भारताच्या वर्ल्डकप विजयात हार्दिकने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर हार्दिक हार्दिक असा जयघोष पाहायला मिळाला. पण याच मैदानावर काही महिन्यांपूर्वी हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली होती. मुंबई इंडियन्स संघाने हंगामापूर्वी हार्दिकची कर्णधारपदी नियुक्ती केली. मुंबई इंडियन्स संघाला ५ जेतेपदं मिळवून देणाऱ्या रोहित शर्माला कर्णधारपदावरून बाजूला केल्यामुळे हार्दिकवर सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष मैदानातही जोरदार टीका-ट्रोलिंग करण्यात आलं. त्यातच मुंबई इंडियन्सची कामगिरी यथातथाच राहिल्याने टीकेचं प्रमाण वाढलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृणालने इन्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, ‘हार्दिक आणि मी स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला सुरू करून जवळपास दहा वर्ष झाली. गेले काही दिवस आमच्यासाठी स्वप्नवत आहेत. बाकी भारतीयांप्रमाणे वर्ल्डकपविजयाचं स्वप्न मी पाहिलं होतं, ते भारतीय संघाने प्रत्यक्षात साकारलं. माझा भाऊ वर्ल्डकपविजेत्या संघाचा भाग होता. फायनलमध्ये त्याने निर्णायक भूमिका बजावली. हार्दिकचा मला प्रचंड अभिमान वाटतो’.

‘गेले सहा महिने हा हार्दिकच्या आयुष्यातला सगळ्यात खडतर काळ होता. त्याच्याबाबतीत जे घडलं तसं तो काहीच वागला नव्हता. त्याची काहीच चूक नव्हती. तो त्याचं काम करत होता. एक भाऊ म्हणून, क्रिकेटपटू म्हणून आणि माणूस म्हणून मला अतिशय वाईट वाटत होतं. मैदानात तसंच सोशल मीडियावर त्याची हुर्यो उडवण्यात आली. वैयक्तिक आयुष्याचा संदर्भ देऊन वाट्टेल ते बोलण्यात आलं. हे सगळं बोलताना, लिहिताना लोक हे विसरले की हार्दिक हाही माणूसच आहे. त्यालाही भावभावना आहेत, मन आहे. त्याने या कठीण काळाला चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन तोंड दिलं. त्याच्यासाठी हे किती कठीण होतं याची मला पूर्ण कल्पना आहे. तो मेहनत करत राहिला. वर्ल्डकप भारताला जिंकून देण्यासाठी जे योगदान त्याला द्यायचा होतं त्यासाठी त्याने अपार कष्ट घेतले. ते त्याच्या खेळातून दिसलं. भारताने वर्ल्डकप जिंकला- हे हार्दिकसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. सहाव्या वर्षापासून तो खेळतो आहे. भारतासाठी खेळायचं आणि वर्ल्डकप जिंकायचा हे त्याचं स्वप्न होतं. खाचखळग्यांनी भरलेली वाट पार करत त्याने जिद्दीने हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं आहे’.

‘हार्दिकवर टीका करणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की अतिशय कमी कालावधीत अविश्वसनीय वाटावीत अशी यशोशिखरं त्याने गाठली आहेत. भारतीय संघाप्रति त्याची निष्ठा अढळ आहे. हार्दिकला कारकीर्दीत अनेकदा टोकाच्या टीकेला-ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. लोकांनी त्याला सपशेल निकालीही काढलं आहे. पण याने त्याच्या एकाग्रतेवर परिणाम झाला नाही. त्याने त्याच्या खेळातून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे’.

‘हार्दिकसाठी देश हे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि पुढेही तेच राहील. बडोद्याच्या एका मुलाकरता आपल्या देशासाठी वर्ल्डकप जिंकून देता येणं यापेक्षा आनंद आणि समाधान देणारं दुसरं काहीच नाही. हार्दिक, तुझा प्रचंड अभिमान वाटतो. आम्हा सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला चाहत्यांचं जे प्रेम मिळतं आहे त्याचा तू हकदार आहेस. तुझ्या आयुष्यात आता चांगल्याच गोष्टी घडतील’.

तुझ्याप्रति प्रचंड आदर वाटतो, बच्चू असं लिहून कृणालने पोस्टचा शेवट केला आहे.

वर्ल्डकपची फायनल विशेषत: हार्दिकने टाकलेली शेवटची ओव्हर बघताना कृणालला अश्रू आवरले नाहीत. आईबरोबर ती मॅच बघतानाचा व्हीडिओ कृणालने शेअर केला आहे. पोस्टबरोबर कृणालने हार्दिकचे लहानपणापासूनचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik has been trolled badly for last six months for no reason nobody thought about his mental health says krunal pandya who writes emotional post psp
Show comments