Hardik Pandya- Natasha Stankovic: टी २० विश्वचषकातील भारताचा विजय हा अनेक कारणांनी चर्चेत राहिला. त्यातीलच एक मुद्दा म्हणजे हार्दिक पंड्याने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुन्हा प्राप्त केलेलं जनतेचं प्रेम. आयपीएल २०२४ च्या वेळी मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद रोहित शर्माच्या हातातून काढून घेतल्याने हार्दिक पंड्याला जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मैदानात शिवीगाळ, छपरी म्हणून हिणवण्याचे प्रकार, सततचे टोमणे यामुळे हार्दिकला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला पण म्हणतात ना, कोळश्याला प्रचंड दबावाखाली ठेवल्यावरच त्याचा हिरा बनतो, त्याप्रमाणेच टी २० विश्वचषकात हार्दिकने हिऱ्यासारखी चमचमती कामगिरी करत ट्रोलर्सचे डोळे दिपवून टाकले. या यशस्वी कामगिरीनंतर हार्दिकचं मुंबईत स्वागतही तितक्याच दणक्यात झालं. ज्या वानखेडेच्या स्टेडियममधून हार्दिकला दूषणं दिली गेली तेच स्टेडियम ४ जुलै “हार्दिक.. हार्दिक”च्या घोषणांनी दुमदुमलं होतं. हा बदल अनुभवून घरी पोहोचल्यावर हार्दिकने एका खास व्यक्तीला आपल्या यशाचे श्रेय देत तिच्यासह फोटो पोस्ट केला आहे. हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाची चर्चा चालू असताना ही पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतेय.
खरंतर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी रोहित शर्मा, सूर्या, बुमराह अशा अनेक खेळाडूंचं कुटुंब बार्बाडोसमध्ये उपस्थित होतं. विराट कोहलीनेही तेव्हा अनुष्का शर्माला व्हिडीओ कॉल करून आपलं यश आपल्या ‘लेडी लक’सह शेअर केलं. पण हार्दिक मैदानात फक्त खेळाडू व चाहत्यांसहच आनंद साजरा करताना दिसला. मुंबईत आल्यावर सुद्धा चाहत्यांनी प्रचंड डोक्यावर घेतलं असलं तरी हार्दिकची पत्नी नताशाने या विजयावर काहीच भाष्य (निदान ऑनलाईन) तरी केलेलं दिसलं नाही. उलट नताशाने ज्यादिवशी टीम इंडिया मायदेशी परतली तेव्हा “देवा मी संकटात असेन तेव्हा मला त्यातून बाहेर काढ आणि नसेन तेव्हा माझं रक्षण कर” अशी पोस्ट केली होती. अशातच आता हार्दिकने घरी पोहोचल्यावर केलेल्या सेलिब्रेशनमध्ये सुद्धा नताशा कुठेच दिसत नाहीये. हार्दिकने आपला लेक अगस्त्यसह फोटो पोस्ट करून “मी जे काही करतो ते तुझ्यासाठीच करतो माझा #१” अशी कॅप्शन लिहिली आहे.
हार्दिकची खास व्यक्तीसाठी पोस्ट
दुसरीकडे हार्दिकचा भाऊ व क्रिकेटर कृणाल पंड्याने मात्र भावाचा एका दशकाचा प्रवास सांगणारी एक पोस्ट इंस्टाग्रामवर केली आहे. कृणालने लिहिले की, “हार्दिक आणि मी व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात करून जवळपास एक दशक झाले आहे. आणि गेले काही दिवस एखाद्या परीकथेसारखे होते, जे आम्ही आतपर्यंत स्वप्नातच पाहिले होते. सर्व देशवासीयांप्रमाणेच मी ही आपल्या संघाच्या कामगिरीने थक्क झालो होतो आणि त्यात माझ्या भावाने एवढं महत्त्वाचं योगदान दिलं ही तर खूपच भावुक करणारी गोष्ट आहे. गेले सहा महिने हार्दिकसाठी सर्वात कठीण गेले आहेत. त्याच्याबाबत असं व्हायला नको होतं. एक भाऊ म्हणून मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटलं. टोमणे, शिव्या, घाणेरडं बोलणं आम्ही सगळं ऐकत होतो. आपल्याकडचे चाहते हे ही विसरले होते की हार्दिक खेळाडू असण्याआधी एक माणूस आहे ज्याला भावना आहेत”
दरम्यान, हार्दिक व नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चांवर आता चाहत्यांनी जवळजवळ शिक्कामोर्तब करून टाकलं आहे. हार्दिकने नुकतीच राधिका मर्चंट व अनंत अंबानी यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती. इथे सुद्धा हार्दिक आपला भाऊ कृणाल, वहिनी पंखुरी व खेळाडू इशान किशन यांच्यासह समारंभाला गेला होता.