टी-२० विश्वचषक २०२२ मधील उपांत्य फेरीचा दुसरा सामना भारत आणि इंग्लंड संघात खेळला गेला. अॅडलेड क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने १० विकेट्सने भारताला पराभूत केले. भारताने इंग्लंडला १६९ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने १६ षटकांत बिनबाद १७० धावा करत लक्ष्य पूर्ण केले.या सामन्यात भारताकडून हार्दिक पांड्याने आक्रमक अर्धशतक झळकावताना युवराज सिंगचा एक विक्रम मोडीत काढला.

गुरुवारी अॅडलेड ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने तुफानी खेळी करत इंग्लंडला चकित केले. १९०.९१च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना पंड्याने ३३ चेंडूत ६३ धावा केल्या. यादरम्यान पांड्याने ४ चौकार (१६ धावा) आणि ५ षटकार (३० धावा) म्हणजेच ४६ धावा ठोकल्या. त्याने 9 चेंडूत चौकारां आणि षटकारांनीच या धावा केल्या.

युवराज सिंगचा मोडला विक्रम –

टी-२० विश्वचषकात भारतासाठी ५व्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना खेळलेली ही सर्वात मोठी खेळी आहे. याआधी हा विक्रम युवराज सिंगच्या नावावर होता, ज्याने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध डर्बनमध्ये ५८ धावा केल्या होत्या.

पांड्याची सुरुवात संथ होती आणि पहिल्या १५ चेंडूत तो केवळ ११ धावाच करू शकला होता. यानंतर त्याने पुढच्या १७ चेंडूत ५० धावा केल्या. पांड्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पहिले अर्धशतक २९ चेंडूत झळकावले. मात्र, दुर्दैवाने भारतीय डावाच्या शेवटच्या चेंडूवर तो हिट विकेट झाला. टी-२० विश्वचषकात हिट विकेट होणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे.

एका वर्षात ५०० धावा –

पाचव्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना, एका वर्षात ५०० किंवा त्याहून अधिक धावा करणारा पांड्या हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.मात्र, पांड्याची झंझावाती खेळी भारताच्या विजयासाठी अपुरी ठरली. अॅलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लंडने भारताला दहा गडी राखून पराभूत करुन, अंतिम फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा – T20 World Cup 2022 : विराट कोहलीने मोडले तेंडुलकर आणि लाराचे विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला क्रिकेटर

भारताच्या १६८ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने १६ षटकांत एकही विकेट न गमावता विजय मिळवला. हेल्सने ४७ चेंडूंत चार चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने नाबाद ८६ धावांची खेळी केली. बटलरने ४९ चेंडूंत नाबाद ८० धावा केल्या, ज्यात त्याने ४ चौकार आणि ३ षटकार लगावले.