Hardik Pandya India’s highest wicket taker against Pakistan : टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९व्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ धावांनी रोमहर्षक पराभव केला. दमछाक करणाऱ्या या सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला १२० धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर पाकिस्तानी संघ २० षटकांत ७ बाद केवळ ११३ धावा करू शकला. या सामन्यात हार्दिक पंड्याने जसप्रीत बुमराहला शानदार साथ दिली. या दरम्यान हार्दिक पंड्याने दोन विकेट्स घेत पाकिस्तानविरुद्ध एक मोठा विक्रम केला आहे.

हार्दिक पंड्याने रचला मोठा विक्रम –

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ४ षटके टाकली आणि २४ धावा देत दोन विकेट्स घेतल्या. यासह तो आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. हार्दिक सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. आतापर्यंत त्याने पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामन्यात एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर कुमार आहे. त्याच्या नावावर ११ विकेट्स आहेत. भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने पाकिस्तान संघाविरुद्ध ७ विकेट्स घेतल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारे भारतीय गोलंदाज:

हार्दिक पंड्या- १३ विकेट्स
भुवनेश्वर कुमार- ११ विकेट्स
अर्शदीप सिंग- ७ विकेट्स
इरफान पठाण- ६ विकेट्स
जसप्रीत बुमराह- ५ विकेट्स

हेही वाचा – IND vs PAK : भारताविरुद्धच्या पराभवानंतर नसीम शाहला अश्रू अनावर, रोहित शर्माने दिला धीर, पाहा VIDEO

ऋषभ पंतने खेळली ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी –

टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘लो स्कोअरिंग’ सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली मोठी खेळी खेळू शकले नाहीत, तेव्हा ऋषभ पंतने भारतीय संघाला तारले. त्याने ४२ धावांची खेळी साकारत टीम इंडियाला ११९ धावांपर्यंत पोहोचवले. मात्र पंतशिवाय एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. या कारणामुळे टीम इंडियाला पूर्ण २० षटकेही खेळता आली नाहीत. पाकिस्तानी संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण भारतीय गोलंदाजांनी हे होऊ दिले नाही.

हेही वाचा – India vs Pakistan सामन्यादरम्यान ‘इम्रान खान यांना मुक्त करा’ असा संदेश लिहिलेलं विमान; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

भारतासाठी जसप्रीत बुमराह ठरला ‘गेमचेंजर’ –

पाकिस्तानविरुद्ध भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराह संघासाठी सर्वात मोठा ‘गेम चेंजर’ ठरला. त्याने भारतीय संघासाठी ४ षटकात केवळ १४ धावा दिल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हार्दिक पंड्याने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंगच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट गेली. भारताच्या या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानी संघ २० षटकांत ७ बाद केवळ ११४ धावाच करू शकला.