टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारतीय क्रिकेट संघाचा प्रवास गुरुवारी उपांत्य फेरीत संपला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा इंग्लंडविरुद्ध १० गडी राखून पराभव झाला. हा पराभव भारतीय खेळाडू आणि समर्थकांसाठी वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पराभवानंतर सहकारी खेळाडू आणि चाहत्यांसाठी एक संदेश लिहिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्दिकने त्याच्या ट्विटरवर काही फोटो शेअर करताना एक मेसेज लिहिला आहे. तो म्हणाला, ”निराश आहे, दुखावलो आहे, धक्का बसला आहे. हा निकाल स्वीकारणे आपल्या सर्वांसाठी कठीण आहे. मी माझ्या सहकारी खेळाडूंसोबतच्या नात्याचा आनंद लुटला आहे. आम्ही प्रत्येक टप्प्यावर एकमेकांसाठी लढलो. आमच्या समर्थन कर्मचार्‍यांच्या अनेक महिन्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाबद्दल धन्यवाद.”

सध्याचा विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळला जात आहे, पण चाहत्यांनी स्टेडियममध्ये जाऊन भारतीय संघाला जोरदार पाठिंबा दिला. भारत जिथे-जिथे सामना खेळला, तिथले स्टेडियम संघाच्या समर्थकांनी भरलेली होती. अशा परिस्थितीत हार्दिकने त्याच्या चाहत्यांचे देखील आभार व्यक्त केले आहेत.

हेही वाचा – Team India: विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारताचे ‘हे’ सात खेळाडू परतणार मायदेशी, बाकीचे न्यूझीलंड दौरा करणार

हार्दिक पांड्या आपल्या चाहत्यांसाठी म्हणाला की, ”आमच्या चाहत्यांसाठी ज्यांनी आम्हाला सर्वत्र साथ दिली, आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. असे व्हायला नको होते, पण आपण त्यात लक्ष घालू आणि संघर्ष सुरूच ठेवू.”

उपांत्य फेरीच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर इंग्लंडने भारतावर १० विकेट्स राखून मात केली. त्यांनी १६९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता पूर्ण केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत ७ बाद १६८ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये हार्दिकने ३३ चेंडूत ६३ धावांची शानदार खेळी खेळली. त्याचवेळी विराट कोहलीने ५० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंड संघाने १६ षटकात बिनबाद १७० धावा केल्या. इंग्लंडकडून अॅलेक्स हेल्सने ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार जोस बटलरने ४९ चेंडूत नाबाद ८० धावा केल्या.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik pandya twitter post for his teammates and fans after india s t20 world cup 2022 exit vbm
Show comments