मेलबर्नच्या ऐतिहासिक क्रिकेट मैदानावर आज टी-२० विश्वचषक २०२२ मधील अतिम सामना, इंग्लंड आणि पाकिस्तान संघात खेळला जात आहे. या सामन्याची नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला १३८ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या गोलंदाजावर या धावसंख्येचा बचाव करण्याची जबाबदारी आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने आपल्या संघासाठी अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या घातक गोलंदाजीने अनेक फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे. पाकिस्तानला हा अंतिम सामना जिंकायचा असेल तर हरिस रौफला चमकदार गोलंदाजी करावी लागेल आणि इंग्लिश फलंदाजांवर सतत दबाव टाकावा लागेल. तथापि, या अंतिम सामन्यापूर्वी, पाकिस्तानी गोलंदाजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीपूर्वीचा काळ आठवला आणि इथपर्यंतच्या प्रवासातील सर्वोत्तम आठवणी शेअर केल्या आहेत.
बिग बॅश लीग (BBL) च्या २०१९-२० हंगामात मेलबर्न स्टार्स (MS) साठी हॅरिस रौफने शानदार गोलंदाजी केली. त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे रौफचा पाकिस्तान संघात समावेश करण्यात आला. या वेगवान गोलंदाजाने सांगितले की त्याचा क्रिकेट प्रवास टेप बॉल क्रिकेटने सुरू झाला.
मी कधीच विचार केला नव्हता की मी एक व्यावसायिक क्रिकेटर बनू शकेन: हरिस रौफ
पाकिस्तान क्रिकेटने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हारिस रौफ म्हणत आहेत, ”अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू टेप बॉल क्रिकेटने सुरुवात करतात आणि मी त्याच पद्धतीने सुरुवात केली. मी रस्त्यावर खेळायचो आणि व्यावसायिक क्रिकेटर होण्याचा विचार कधीच केला नव्हता. मी अभ्यास करायचो आणि सेल्समन म्हणून अर्धवेळ कामही करायचो.”
हारिस रौफ पुढे म्हणाला, ”मी जेव्हा माझ्या विद्यापीठात प्रवेश घेतला तेव्हा मी वेगवेगळ्या शहरांमध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळू लागलो आणि माझ्या फीसाठी पैसे कमवू लागलो. २०१७ मध्ये मी लाहोर कलंदरच्या ट्रायलसाठी गेलो आणि तिथे माझी निवड झाली.”
हेही वाचा – ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का; अपघातात ग्लेन मॅक्सवेलच्या पायाला दुखापत
हारिस रौफने आतापर्यंत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये सहा सामन्यांत ७.०४ च्या इकॉनॉमीने ६ विकेट घेतल्या आहेत. रौफला शेवटच्या षटकांमध्ये खेळणे खूप कठीण आहे. जगातील कोणत्याही फलंदाजाकडे त्याच्या यॉर्करचे उत्तर नाही.