Haris Rauf Reaction on Viral Fight video With Fan: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ वादात सापडला आहे. भररस्त्यात चाहत्याशी भांडण करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असून रौफ आणि त्याची पत्नी फिरत होत. तेव्हा कोणीतरी त्याच्यावर कमेंट केली. यामुळे रौफ भलताच संपला आणि त्याला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. रौफला रोखण्यासाठी त्याची पत्नीही मागे धावली. लोकही जमले आणि बराच वेळ हा वाद सुरू होता. पण आता या वादावर हारिस रौफने आपली बाजू मांडली आहे.
रौफचा हा व्हिडिओ मंगळवारी दुपारी व्हायरल झाला. ज्यामध्ये तो अमेरिकेतील एका पाकिस्तानी चाहत्याला भारतीय समजून त्याच्या कमेंटवर त्याला मारण्यास सरसावला. पत्नीसोबत उभ्या असलेल्या रौफने तिचा हात सोडला आणि त्याच्या अंगावर धावून गेला. या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांचं बोलणंही थोडं थोडं ऐकू येत आहेत. हारिस रौफ त्या चाहत्याला म्हणाला हा भारतीय वाटतोय. यावर तो चाहताही ठाम उभा राहिला आणि त्याला म्हणाला- मी पाकिस्तानी आहे. दरम्यान रौफला रोखण्यासाठी अनेक जण मध्ये आलेले दिसले. त्यापैकी काही आयसीसी टी-२० विश्वचषकाशी संबंधित असल्याचेही दिसून आले. त्याच्या गळ्यात आयसीसीचे ओळखपत्र होते.
हेही वाचा – रोहित ‘नरेंद्र मोदी’ तर विराट कोण? भारतीय क्रिकेटपटू कॅबिनेट मंत्री असते तर कोणती पदे सांभाळतील; पाहा फोटो
चाहत्यासह भांडणाच्या व्हीडिओवर काय म्हणाला हारिस रौफ?
पाकिस्तानी खेळाडूचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हारिस रौफने एक्सवर पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिले आहे. स्पष्टीकरण देताना रौफने लिहिले की, ‘मी हा वाद सोशल मीडियावर न आणण्याचा निर्णय घेतला होता, परंतु हा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे यावर माझे मत मांडणं मला महत्त्वाचे वाटते. एक सामाजिक व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही लोकांकडून सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया स्वीकारण्यास तयार आहोत. आम्हाला पाठिंबा देण्याचा किंवा टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे. पण प्रश्न जेव्हा आई-वडिलांचा आणि कुटुंबाचा येतो तेव्हा मी प्रत्युत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही. एखादी व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांबद्दल आदर दाखवणे महत्वाचे आहे, मग त्यांचं प्रोफेशन कोणतंही असो.’
— Haris Rauf (@HarisRauf14) June 18, 2024
पाकिस्तानचा संघ टी-२० विश्वचषक २०२४ मधून गट टप्प्यातील सामन्यांमधूनच बाहेर पडला आहे. यानंतर काही खेळाडूंनी अमेरिकेमध्ये राहत सुट्ट्यांचा आनंद घेण्याचा निर्णय घेतला तर काही खेळाडू मायदेशी परतले आहेत.