गेल्या काही काळापासून विराट कोहली आपल्या खराब खेळीमुळे सर्वांच्याच टीकेचा धनी ठरला होता. आयसीसी टी२० विश्वचषक २०२१मध्ये भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत होता. मात्र त्यावेळेस भारत उपांत्य फेरीपर्यंतही पोहोचला नाही. यंदाचे विश्वचषक भारत रोहित शर्माच्या कप्तानीमध्ये खेळत आहे. यावेळी भारताची कामगिरी चांगली आहेच, मात्र त्याचबरोबर विराटचे प्रदर्शन पाहून सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला आहे. आपल्या बेधडक खेळीने विरोधी संघाच्या छातीत धडकी भरवण्यासाठी विराट ओळखला जातो. टेस्ट मॅच असो वा आंतरराष्ट्रीय सामना, विराट प्रत्येकवेळी आपले १००% देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो.
टी२० विश्वचषक २०२२मध्ये विराटच्या खेळीमुळे क्रिकेटप्रेमची नाही तर विरोधी संघाचे खेळाडूही प्रभावित झाले आहेत. दरम्यान, पाकिस्तानचा माजी कप्तान वसीम अक्रमने विराटच्या सध्याच्या खेळीवर मोठे वक्तव्य केले आहे. इतकेच नाही तर पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिक यानेही यावर आपले मत व्यक्त केले आहे.
वसीम अक्रम म्हणाला की विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढण्यात आल्यानंतर तो निराश होऊ शकला असता. मात्र असे न करता त्यांने हे पद सोडण्याचा निर्णय घेतला. कर्णधारपद सोडल्यानंतरही विराटचा खेळाडू म्हणून असलेला उत्साह कमी झालेला नाही. वसीम पुढे म्हणाला की कर्णधारपद सोडल्यानंतर विराट शॉर्ट फाईन लेगवर शांतपणे उभा राहू शकला असता. मात्र त्याने एक फलंदाज म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर विराट हा भारतीय संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकीही एक आहे.
हेही वाचा : बाळाला कडेवर घेऊन भाषण केलं म्हणून महिला आयएएस अधिकारी ट्रोल; पतीने दिलेलं उत्तर जिंकेल तुमचं मन
दरम्यान, पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकनेही विराटचे कौतुक केले आहे. तो म्हणाला की विराटकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. विशेष म्हणजे शोएबने यावेळी पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली उडवली. तो म्हणाला, “तुम्ही पाकिस्तानमध्ये धावा केल्यावर मान उंच करून फिरता. असे करण्यात काहीच चुकीचे नाही. मात्र प्रत्येकाने नेहमी आपल्या संघासाठी खेळावे. विराट कोहलीचे हेच वैशिष्ट्य आहे की तो संघामधील ऊर्जा कायम ठेवतो आणि सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे संघाला मदत करण्याचा प्रयत्न करतो.”