Virat Kohli funny video during India vs Bangladesh match : आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघा विजयी रथावर स्वार असून अजून एकही सामना गमावला नाही. सुपर-८ च्या दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध ५० धावांनी दणदणीत विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात १९६ धावांचा मोठा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात भारताच्या तगड्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ ८ विकेट्स गमावून केवळ १४६ धावांपर्यंत मजल मारू शकला. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने असे काही केले, ज्यामुळे चाहत्यांना गल्ली क्रिकेटची आठवण झाली. ज्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अगोदर आपल्या फलंदाजीने चाहत्यांचे मनोरंजन केले. या सामन्यात विराटने २८ चेंडूंचा सामना करताना ३ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ३७ धावा केल्या. मागील काही सामन्यापासून धावा काढण्यासाठी झगडणाऱ्या विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात आपले कौशल्य दाखवले. यानंतर आपल्या मजेशीर क्षेत्ररक्षणाने चाहत्यांना हसायला भाग पाडले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा खेळाडू जेव्हा जेव्हा मैदानात येतो, तेव्हा चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन करतो.
विराट कोहली स्टेजच्याखाली घुसल्याचा व्हिडीओ व्हायरल –
बांगलादेशविरुद्ध गोलंदाजी करताना भारतीय संघाने झटपट ६ विकेट्स घेतल्या. अखेरीस, रिशाद हुसेनने १० चेंडूत ३ षटकार ठोकत २४ धावा करत संघाच्या चाहत्यांना काही चांगले क्षण दिले. या दरम्यान, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मनोरंजनाचा केंद्रबिंदू ठरला. झाले असे की रिशादने षटकार मारला आणि चेंडू सीमारेषेबाहेर ठेवलेल्या छोट्या स्टेज खाली गेला. त्यावेळी विराट कोहलीने चाहत्यांना गल्ली क्रिकेटची आठवण करुन दिली. कारण कोहली चेडूं आणण्यासाठी बाहेर गेला. त्यावेळी चेंडू स्टेजच्याखाली गेला होता, त्यामुळे त्याच्या हाताला येत नव्हता. म्हणून विराट कोहली गुडघ्यावर बसला आणि स्टेजच्याखाली शिरला आणि चेंडू बाहेर काढला, ज्यामुळे चेंडू बाहेर काढला आणि सामना पुन्हा सुरू झाला. यानंतर आता विराटची कोहलीची ही शैली चाहत्यांना खूप आवडत आहे, त्यामुळे या व्हायरल व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडताना दिसत आहे.
हेही वाचा – IND vs BAN : “पॉकेट रॉकेट”, सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी ‘या’ भारतीय खेळाडूला दिले नवीन नाव, पाहा VIDEO
भारतीय फलंदाजांनी दाखवून दिली आपली ताकद –
या सामन्यात टीम इंडियाकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. सलामीला आलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पहिल्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली होती. रोहित (२३ धावा) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत गेला आणि झेलबाद झाला. विराट कोहली नक्कीच फॉर्ममध्ये दिसत होता, पण तो ३७ धावांवर हसन शाकिबच्या गोलंदाजीवर बाद झाला. प्रत्येक सामन्याप्रमाणेच पंतने येताच मोठे फटके मारायला सुरुवात केली, पण मोठी खेळी खेळता आली नाही. ३६ धावा करून पंत रिशाद हुसेनचा बळी ठरला. हार्दिक पंड्याने नाबाद अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूत ५० धावा केल्या, ज्यात त्याने ४ चौकार आणि ३ षटकारही ठोकले. शिवम दुबेने २४ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले.
कुलदीप यादवच्या फिरकीची कमाल –
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादवच्या फिरकीची जादू पाहायला मिळाली. त्याने संघासाठी सर्वाधिक ३ विकेट्स घेत बांगलादेश संघाची बॅटींग ऑर्डर उद्ध्वस्त केली. कुलदीपने तांझिद हसन, तौहीद हृदय आणि शाकिब अल हसन यांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याच वेळी, हार्दिक पंड्याने अगोदर फलंदाजीत दमदार प्रदर्शन केल्यानंतर गोलंदाजीतही आपले योगदान दिले. त्याने एक विकेट घेतली. त्याचबरोबर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने २-२ विकेट्स घेतल्या.