Rohit Sharama: रोहित शर्मा अर्थात टीम इंडियाच्या हिटमॅनच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी 20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे. दक्षिण अफ्रिकेविरोधात झालेल्या अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात भारताने सात धावांनी सामना जिंकला आणि विश्वचषकाची १७ वर्षांची प्रतीक्षा संपवली. यानंतर टीम इंडियाचं चांगलंच कौतुक होतं आहे. अशात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने गुडमॉर्निंग करत सेल्फी शेअर केला आहे. जो चांगलाच व्हायरल झालाय.

रोहित शर्माचा सेल्फी व्हायरल

विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकाच्या ट्रॉफीसह सेल्फी शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा अंथरुणावर झोपलेला दिसत आहे, तर त्याच्या शेजारी टी20 विश्वचषकाची दिमाखदार ट्रॉफी दिसत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा विश्वचषक जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठला तेव्हा त्याच्या शेजारी T20 विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी होती. हा अनमोल क्षण त्याने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. त्याचा हा सेल्फी व्हायरल झाला आहे.

हे पण वाचा- IND vs SA: “मी आदल्या रात्री…”, रोहित शर्माचे जेतेपदानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, “मला कोणत्याही परिस्थितीत ट्रॉफी जिंकायचीच होती”

भारत विश्वविजेता झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. याआधी विराट कोहलीनेही टी20 फॉरमॅटचा निरोप घेतला. रोहित शर्माच्या निवृत्तीने त्याचे चाहते हळहळले आहेत. टी20 विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर पहिल्यांदा विराट कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आणि त्यानंतर काही वेळाने कर्णधार रोहित शर्माने मीडियासमोर निवृत्तीची घोषणा केली. हा भारतासाठी दुहेरी धक्का होता.

टीम इंडियावर बक्षीसांचा वर्षाव

यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करून जगज्जेतेपद पटकावलं आहे. भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर आयसीसीकडून (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) टीम इंडियाला बक्षीस मिळालं आहेच, त्याचबरोबर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही टीम इंडियासाठी मोठ्या बक्षीसाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियासाठी १२५ कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

हे पण वाचा- Team India : विराट-रोहितनंतर ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूनेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला रामराम

जय शाह यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून जगज्जेत्या भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. तसेच त्यांच्यासाठी १२५ कोटी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा करतान आनंद होत असल्याचं वक्तव्य केलं आहे. शाह यांनी म्हटलं आहे की टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत असाधारण कामगिरी केली आहे. त्यांनी या स्पर्धेत त्यांची प्रतिभा आणि दृढनिश्चय दाखवला, त्यांनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं, या अनन्यसाधारण कामगिरीसाठी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचं अभिनंदन असं म्हणत पोस्ट केली आहे.