भारतीय क्रिकेट संघाने १० वर्षांचा आयसीसी चषकाचा दुष्काळ संपवत टी-२० विश्वचषकाचे (२०२४) जेतेपद पटकावलं आहे. विराट कोहलीचं अर्धशतक, सूर्यकुमार यादवचा अफलातूल झेल, जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारत टी-२० चॅम्पियन ठरला. बार्बाडोसमध्ये भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात आश्चर्यकारक विजय मिळवला. अखेरच्या सामन्यात जलदगती गोलंदाज आणि विराट कोहलीमुळे विजय मिळाला असला तरी भारतीय संघाला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात संघातील तिन्ही फिरकीपटूंचा देखील मोठा वाटा आहे. प्रामुख्याने कुलदीप यादव आणि अक्षर पटेलला या कामगिरीचं श्रेय द्यावं लागेल. स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील खेळपट्टी फिरकीला अनुकूल नसल्याने रोहित शर्माची ही दोन अस्त्रं प्रभावी ठरू शकली नव्हती. मात्र, त्याआधीच्या प्रत्येक सामन्यात या दोघांनी त्यांची जबाबदारी नीट पार पडली होती. त्यामुळेच भारताला अंतिम सामन्याचं तिकीट मिळालं. या विश्वचषक स्पर्धेत कुलदीप यादव हे कर्णधार रोहित शर्माचं ट्रम्प कार्ड ठरलं.

कुलदीप यादवने अनेक अडचणींवर मात करून इथवर प्रवास केला आहे. २०१९ च्या आयपीएलमधील खराब कामगिरी आणि त्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे त्याने भारतीय संघातील त्याचं स्थान गमावलं होतं. मात्र त्याने दोन वर्षांपूर्वी संघात दमदार पुनरागमन केलं, तसेच तो भारतीय गोलंदाजीचा अविभाज्य भाग बनला. भारताच्या या टी-२० विश्वचषक विजयाचं श्रेय जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहलीला दिलं जातंय. ते द्यायला हवंच, मात्र या विजयात कुलदीपचाही मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही.

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला होता की, या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात ४ फिरकीपटूंचा समावेश का केलाय? त्यावर रोहितने सांगितलं होतं, मी आत्ता यावर काही बोलणार नाही, परंतु, मला आणि संघव्यवस्थापनाला संघात चार फिरकीपटू हवे आहेत आणि आम्हाला चार फिरकीपटू दिलेत याचा आनंद आहे.

मैदानात ढसाढसा रडला, पाठोपाठ दुखापतीमुळे संघातील स्थान गमावलं

कुलदीप यादव २०१४ ते २०२१ ही आठ वर्षे इंडियन प्रीमियर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाकडून खेळत होता. २०१९ च्या आयपीएलमध्ये कुलदीप यादवची कामगिरी खराब राहिली. ज्यामुळे त्याचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झालं होतं. १९ एप्रिल २०१९ रोजी आयपीएलमध्ये कोलकाता विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात कुलदीप यादवच्या एकाच षटकात बंगळुरूच्या मोईन अलीने तब्बल २७ धावा फटकावल्या होत्या. या धुलाईनंतर कुलदीप यादव मैदानात रडला होता. बंगळुरूच्या फलंदाजांनी कुलदीपच्या चार षटकांत ५९ धावा चोपल्या होत्या. या सामन्यात बंगळुरूने निर्धारित २० षटकांत २१३ फटकावल्या होत्या. तसेच कोलकात्यावर १० धावांनी मात केली होती. २४ वर्षीय कुलदीप यादव सामन्यानंतर रडू लागला होता. आपल्यामुळेच सामना गमावला असं त्याला वाटू लागलं होतं. त्यानंतरच्या सामन्यांमध्ये त्याला सूर गवसला नाही. त्याच्या फिरकीची धार बोथट होऊ लागली. याच काळात त्याला दुखापतही झाली.

दुखापतीतून सावरल्यानंतर कुलदीप मैदानावर परतला खरा. मात्र त्याची गोलंदाजी सुमार दर्जाची झाली होती. त्याला बळी मिळत नव्हते. त्याच्या गोलंदाजीवर विरोधी संघातील फलंदाज खोऱ्याने धावा जमवू लागले होते. परिणामी त्याने भारतीय संघातील स्थान गमावलं. बंगळुरूविरोधातील सामन्यानंतर त्याने आत्मविश्वास गमावला होता. २०२० आणि २०२१ मध्ये करोना काळात फारसे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने झाले नाहीत. परंतु, जे सामने खेळवण्यात आले त्यात कुलदीपला फारशी संधी मिळाली नाही. २०१७, २०१८ मध्ये कुलदीप यादवची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी पाहून त्याला भारतीय संघातील उगवता तारा म्हटलं जात होतं. तोच कुलदीप आता फॉर्मशी झगडत होता. भारतीय संघव्यवस्थापन देखील या काळात नव्या फिरकीपटूचा शोध घेऊ लागलं. याच काळात वॉशिंग्टन सुंदरला संघात स्थान मिळालं, तर युजवेंद्र चहल संघातील नियमित फिरकीपटू बनला. त्याचबरोबर रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा हे देखील नियमित गोलंदाज होतेच. कुलदीप मात्र सर्वांच्या नजरेआड झाला.

२०२२ मध्ये कुलदीपने त्याच्या गोलंदाजीवर अधिक कष्ट घेतले. त्याच्या गोलंदाजीत काही बदलही केले. ज्याचं त्याला चांगलं फळ मिळालं. त्याने २०२२ च्या आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळताना उत्तम कामगिरी केली. २०२२ च्या स्पर्धेत कुलदीप दिल्लीकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला. त्याने स्पर्धेतील १४ सामन्यात २० च्या सरासरीने २१ बळी घेतले. स्पर्धेतील तो पाचवा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. या कामगिरीमुळे त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले गेले. टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर त्याने एकदिवसीय आणि टी-२० या प्रकारात चांगली कामगिरी केली. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघातील नियमित फिरकीपटू बनला आहे.

हे ही वाचा >> ‘रोहितसह चार मुलांनी ६५ अंडी खाल्ली होती…’, जेतेपदानंतर हिटमॅनच्या बालपणीच्या कोचने सांगितला मजेशीर किस्सा

मी तेव्हा हादरून गेलो होतो : कुलदीप

कोलकात्याविरुद्धच्या सामन्याबाबत कुलदीप म्हणाला, तो सामना माझ्यासाठी मोठा धक्का होता. कारण माझी इतकी धुलाई कधीच झाली नव्हती. मी यापूर्वी अनेकदा चिन्नास्वामी स्टेडियमवर (बंगळुरू) खेळलोय. परंतु, कोणत्याही फलंदाजाने कधीच माझी इतकी धुलाई केली नाही. मात्र त्या दिवशी मोईन अलीने माझ्या एकाच षटकात २७ धावा फटकावल्या. मी विचार करत होतो, हे काय झालं? कसं झालं? याने माझी इतकी धुलाई कशी काय केली? त्या सामन्यापूर्वीपर्यंत मी डावखुऱ्या फलंदाजाना कमी लेखायचो. डावखुरा फलंदाज माझ्याविरोधात इतका चांगला खेळू शकत नाही, असं मला वाटायचं. मात्र मोईन अलीने केलेल्या त्या फलंदाजीनंतर मी विचार करत होतो की याने माझी इतकी धुलाई कशी काय केली? मला वाटत होतं माझ्यामुळे कोलकात्याने हा सामना गमावला आहे. १५ षटकांत त्यांच्या १२५ धावा झाल्या होत्या. मी १६ वं षटक टाकलं आणि १६ व्या षटकानंतर त्यांची धावसंख्या १५० च्या पुढे गेली होती. माझ्या त्या षटकामुळे सामना फिरला. मला आजही वाटतं की त्या षटकामुळे तो सामना फिरला आणि बँगलोरने जिंकला. त्या सामन्यानंतर मला रोहित शर्माने फोन करून धीर दिला. हार्दिक पांड्यानेही मला फोन केला होता. ते दोघेही मला म्हणाले, ‘फार विचार करू नको. टी-२० क्रिकेटमध्ये असं होऊ शकतं’. पण मी आतून हादरून गेलो होतो.

रोहित शर्माचंही योगदान

कुलदीप संघाबाहेर असताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा त्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होता. त्याने प्रशिक्षक आणि कुलदीपला त्याच्या गोलंदाजीत काय बदल करायला हवेत, कुलदीपने कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवं याबाबत काही गोष्टी त्यांना सांगितल्या. ज्यावर कुलदीपने मेहनत घेतली आणि तो फॉर्ममध्ये परत आला. ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन या कार्यक्रमात स्वतः कुलदीपने यावर भाष्य केलं होतं. कुलदीपने त्याच्या गोलंदाजीत सुधारणा केल्यानंतर तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचं ट्रम्पकार्ड बनला. कुलदीपने आयपीएलमधील कामगिरी देखील सुधारली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने ११ सामन्यांत २३ च्या सरासरीने १६ बळी घेतले होते.

हे ही वाचा >> IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

…नवा कुलदीप भारताला आणखी काही सामने, मालिका आणि स्पर्धा जिंकवून देईल!

काही वर्षांपूर्वी एका सामन्यात झालेल्या धुलाईमुळे ज्या गोलंदाजाचं खच्चीकरण झालं होतं, ज्याला मार्गदर्शनाची गरज भासत होती तोच गोलंदाज आता भारतीय संघाचं ट्रम्प कार्ड बनला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कुलदीपने पाच सामन्यांमध्ये २० च्या सरासरीने १० बळी घेतले आहोत. सुपर ८ फेरीमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारत एका क्षणी पिछाडीवर होता. सलामीवीर ट्रेव्हिड हेड आणि ग्लेन मॅक्सवेल भारताच्या हातून सामना हिरावतील असं वाटत असतानाच कुलदीपने मॅक्सवेलला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. कुलदीपने मॅक्सवेलसमोर टिच्चून गोलंदाजी केली. कुलदीपची अलीकडच्या काळातील कामगिरी पाहता तो केवळ गोलंदाज म्हणूनच नव्हे तर संघातील प्रमुख खेळाडू म्हणून विकसित झाला आहे. मैदानातील परिस्थिती, समोर असणारे खेळाडू पाहून तो सातत्याने गोलंदाजीत नवनवे बदल करताना दिसतो. हा नवा कुलदीप यादव भारताला आणखी काही सामने, मालिका आणि स्पर्धा जिंकवून देईल यात शंका वाटत नाही.