Fan Girl Apologizes to Hardik Pandya Video Viral : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ मुंबईत पोहोचला. संघाचे स्वागत करण्यासाठी हजारो चाहते देशाच्या आर्थिक राजधानीच्या रस्त्यांवर उभे होते. मुंबई शहर आपल्या नायकाची झलक पाहण्यासाठी आतुर असलेले दिसले. दरम्यान, एका चाहतीने हार्दिक पंड्याची माफी मागितली आहे. या चाहतीने सांगितले की, इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या हंगामात तिने हार्दिक पंड्याला ट्रोल केले होते. आता या चाहतीने लाइव्ह टीव्ही चॅनलवर आपल्या चुकीबद्दल माफी मागताना खंतही व्यक्त केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीवर हार्दिक पंड्याच्या या चाहतीने कबूल केले की, आयपीएलदरम्यान तिने मुंबई इंडियन्सच्या नवीन कर्णधाराबद्दल अनेक वाईट गोष्टी बोलल्या होत्या. आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केला होता. फ्रँचायझीने त्याला संघाचा कर्णधारही नियुक्त केले होते. हार्दिकने दोन मोसमात गुजरात संघाचे नेतृत्व केले होते. दोन्ही वेळा संघाने अंतिम फेरी गाठली. पण २०२४ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी राहिला.
इंडिया टुडेशी बोलताना चाहती म्हणाली, ‘सर्वप्रथम मला हार्दिक पंड्याची माफी मागायची आहे. मी त्याला का ट्रोल केले हे मला माहीत नाही. त्यामुळे मी त्याची खूप-खूप माफी मागते. त्याने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टाकलेले शेवटचे षटक खूपच कमाल होते. त्यासाठी त्याचे खूप-खूप अभिनंदन. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा त्याची माफी मागते. मी तुला वाईट का बोलले? मला माहित नाही.’
हेही वाचा – आयसीसीच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे नामांकन जाहीर, रोहितला बुमराहसह ‘हा’ खेळाडू देतोय टक्कर, कोण मारणार बाजी?
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंड्याने अप्रतिम कामगिरी केली. त्याने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरला झेलबाद करत भारतीय संघाचा विजय निश्चित केला. सूर्यकुमार यादवने सीमा रेषेवर त्याचा अप्रतिम झेल घेतला. यापूर्वी हार्दिकने १७व्या षटकात धोकादायक दिसणाऱ्या हेनरिक क्लासेनची विकेटही घेतली होती. भारताने हा सामना सात धावांनी जिंकला.
हेही वाचा – Jasprit Bumrah : पंतप्रधान मोदींनी ‘ज्युनियर’ बुमराहवर केला प्रेमाचा वर्षाव, जसप्रीतच्या मुलाला कडेवर घेतलेला फोटो व्हायरल
टीम इंडियाची विजय परेड मुंबईत संपन्न –
टी-२० विश्वचषक २०२४ ची ट्रॉफी जिंकून भारतीय क्रिकेट संघ अखेर मायदेशी परतला. बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामना जिंकल्यानंतर, तेथे आलेल्या चक्रीवादळामुळे टीम इंडिया लगेच निघू शकली नाही. टीम इंडियाचे सर्व खेळाडू बार्बाडोसहून एअर इंडियाच्या विशेष विमानाने थेट दिल्लीला पोहोचल्यानंतर हॉटेलकडे रवाना झाले, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी टीम सकाळी ११ वाजता पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचली. यानंतर टीम इंडिया मुंबईत पोहोचली. जिथे विजयी परेड पार पडली आणि शेवटी वानखेडे स्टेडियमवर खेळाडूंचा गौरव करण्यात आला.