Babar Azam says I can’t play in every player’s place : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी काही खास नव्हती. विशेष म्हणजे पाकिस्तान संघाला अमेरिकेविरुद्धच्या सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाकडून ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यानंतर बाबरच्या सेनेने कॅनडा आणि आयर्लंड यांच्याविरुद्ध निश्चितच संघर्षपूर्ण विजय मिळवला. पण सुपर ८ फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी हे पुरेसे नव्हते. आता टी-२० विश्वचषकातून पाकिस्तान संघ बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझमने प्रतिक्रिया दिली आहे.
मायदेशी परतल्यावर आढावा घेतला जाईल: बाबर आझम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम टी-२० विश्वचषक २०२४ मधील सुपर ८ फेरीपूर्वीच बाहेर पडल्यानंतर खूपच निराश झाला आहे. मायदेशी परतल्यानंतर पाकिस्तान संघाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल, असे बाबर आझमने सांगितले. बाबरने कबूल केले की त्यांचा संघ चांगला खेळला नाही आणि ‘क्लोज मॅचेस’मध्ये मागे पडला.
‘जेव्हा तुम्ही विकेट लवकर गमावता तेव्हा तुमच्यावर दबाव येतो’ –
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर म्हणाला, “आम्ही सामन्यात लवकर विकेट घेतल्या. पण आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. सतत विकेट गमावल्या, पण कसे तरी लक्ष्य गाठले. गोलंदाजीसाठी परिस्थिती अनुकूल होती, पण अमेरिका आणि भारताविरुद्ध फलंदाजीत काही चुका झाल्या. जेव्हा तुम्ही विकेट गमावता तेव्हा तुमच्यावर दबाव येतो.”
हेही वाचा – VIDEO : “बाबर आझमच्या जागी मी असतो तर राजीनामा दिला असता”, शोएब मलिकचे कर्णधाराबाबत मोठे वक्तव्य
‘आता काय बाकीच्या १० खेळाडूंच्याही जागी मीच खेळू का?’
बाबर आझम म्हणाले, ‘प्रत्येकजण दुःखी आहे. आम्ही संघ म्हणून खेळलो नाही. मी तुम्हाला सांगितले की आम्ही एका खेळाडूमुळे हरलो नाही. आम्ही एक संघ म्हणून हरले. मी हे कोणा एका व्यक्तीमुळे बोलत नाही. कर्णधारामुळे आम्ही हरलो हे तुम्ही सूचित करत आहात. आता काआता काय बाकीच्या १० खेळाडूंच्याही जागी मीच खेळू का? संघात ११ खेळाडू आहेत आणि त्या प्रत्येकाची स्वतःची भूमिका होती. त्यामुळेच ते विश्वचषक खेळण्यासाठी येथे आले होते. मला वाटते की एक संघ म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टींची योग्य प्रकारे अंमलबजावणी करू शकलो नाही. त्यामुळे आम्हाला शांत राहावे लागेल. त्याचबरोबर एक संघ म्हणून चांगली कामगिरी केली नाही हे स्वीकारले पाहिजे.”
हेही वाचा – T20 WC 2024 : सुपर ८ फेरीतील भारताचे सामने ठरले, जाणून घ्या रोहितची सेना कधी आणि कोणत्या संघाशी भिडणार?
आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाने तीन विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तान संघाच्या विजयाचा हिरो ठरला तो शाहीन शाह आफ्रिदी. तीन विकेट्स घेतल्यानंतर शाहीनने दोन षटकारांच्या मदतीने नाबाद १३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर शाहीन आफ्रिदी म्हणाला, “आम्ही देशाला अपेक्षित असे क्रिकेट खेळलो नाही. त्यामुळे आता काही विभागांमध्ये सुधारणा कराव्या लागतील.”