Jasprit Bumrah Reveals Mantra To Mentor Young Pacers : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला की, तो नव्या पिढीच्या गोलंदाजांना जास्त शिकवून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही. तो म्हणाला की, जेव्हा एखादा तरुण गोलंदाज त्याच्याकडे काही विचारायला येतो तेव्हाच तो मदत करतो. कारण त्याला कोणावरही अतिरिक्त भार टाकायचा नाही. ३० वर्षीय बुमराहची भूमिका टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारतासाठी महत्त्वाची असेल. मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांसारख्या कमी अनुभवी वेगवान गोलंदाजांसाठी तो मार्गदर्शकाची भूमिका बजावू शकतो.
तरुण खेळाडूंनी जास्त माहितीचे ओझे न बाळगू नये –
जसप्रीत बुमराहच्या मते तरुण खेळाडूंनी जास्त माहितीचे ओझे न बाळगता त्यांचा मार्ग मोकळा करणे महत्त्वाचे आहे. जसप्रीत बुमराहने टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटला सांगितले की, ‘तुम्ही जास्त शिकवण्याचा प्रयत्न करू शकत नये. ही गोष्ट मी अनुभवातून शिकलो आहे. जेव्हा जेव्हा कोणी माझ्याकडे मदतीसाठी येतो, तेव्हा मी त्याला प्रश्न विचारू देतो. कारण मला जास्त माहिती देणे आवडत नाही.’
जस्सी पुढे म्हणाला, “नशीबाच्या जोरावर तो इथपर्यंत पोहोचला आहे असे नाही. मी माझ्या अनुभवातून जे शिकलो तेच मी त्यांना देतो, पण मी त्यांच्यावर जास्त माहितीचे ओझे टाकू इच्छित नाही. कारण हा देखील तुमच्या प्रवासाचा एक भाग आहे. पुढे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पद्धती आणि उपाय शोधावे लागतील.”
या सर्व गोष्टी माझ्या प्रक्रियेचा भाग –
दुखापतीमुळे, बुमराह २०२२ मधील टी-२० विश्वचषक स्पर्धेत भाग घेऊ शकला नव्हता, परंतु त्याच्या पुनरागमनानंतर त्याने २०२३ मधील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. तो म्हणाला, “काही गोष्टी माझ्या नुसार होतील आणि काही गोष्टी माझ्या नुसार होणार नाहीत. या सर्व गोष्टी माझ्या प्रक्रियेचा भाग असतील. त्यामुळे मला आता समजले आहे की मला खेळ आवडतो म्हणून मी खेळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे निकालापेक्षा या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहे.”
हेही वाचा – T20 World Cup : ॲक्शन…थ्रिलर…रोमांच, सर्व काही एकाच सामन्यात, जाणून घ्या भारताने २००७ ची फायनल कशी जिंकली?
भारतीय संघ दुसऱ्यांदा चॅम्पियन बनण्याकडे डोळे लावून बसला आहे. टीम इंडियाने २००७ मध्ये उद्घाटनाच्या हंगामात हे विजेतेपद पटकावले होते. १७ वर्षे उलटली, पण संघाला एकदाही टी-२० विश्वचषक जिंकता आला नाही. मात्र, भारतीय संघाने २०१४ मध्ये अंतिम फेरीत आणि २०१६ आणि २०२२ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती, मात्र त्यांना विजेतेपद मिळवता आले नव्हते. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिकेतील नऊ ठिकाणी टी-२० विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये वेस्ट इंडिजचे सहा तर अमेरिकेचे तीन स्थान आहेत.