टी-२० विश्वचषकाच्या अव्वल १२ फेरीमधील भारताचा पहिलाच सामना फारच रोमहर्षक झाला. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा निकाल अगदी शेवटच्या चेंडूवर भारताच्या बाजूने लागला. भारताने यशस्वीपणे १६० धावांचं लक्ष्य पूर्ण करत चार गडी राखून हा सामना जिंकला. या सामन्यामध्ये भारताला विजय मिळवून देण्यात विराट कोहलीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. विराटने आणि भारतीय संघाने शेवटपर्यंत संयम कायम ठेवत संघाला विजय मिळवून दिला. मात्र या पहिल्याच सामन्यातून पाकिस्तानलाही स्पर्धेत पुढील वाटचाल करण्यासाठी बऱ्याच सकारात्मक गोष्टी सापडल्या.
नक्की वाचा >> Ind vs Pak: “…तर भारताला विश्वचषक जिंकणं शक्य नाही”; रोमहर्षक सामना भारताने जिंकल्यानंतर इंझमाम-उल-हकचं विधान
पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या युट्यूब चॅनेलवर पाकिस्तानी संघाचं कौतुक केलं आहे. सलामीवीर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसारखे आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर इफ्तिकार अहमत आणि शान मसूदने केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानला सन्मानजक धावसंख्या उभारता आली याबद्दल शोएब अख्तरने या दोघांचंही कौतुक केलं. तसेच त्याने पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज हॅरिस रोफ आणि नसिम शाह या दोघांचंही कौतुक केलं. या दोघांमुळेच भारताची अवस्था चार बाद ३१ अशी झाल्याचं शोएब अख्तर म्हणाला.
नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…
“पाकिस्तानने चांगली कामगिरी केली. निराश होण्याची गरज नाही. तुम्ही चांगला खेळ केला. मात्र भारताने फारच सुंदर केला. इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक सामना त्यांनी जिंकला. यामध्ये सुटलेले झेल, धावबाद झालेले खेळाडू, नो बॉल, वाद, स्टम्पींग असं सारं काही होतं,” असं अख्तरने म्हटलं आहे. आपल्या युट्यूब चॅनेलवर या सामन्याचं विश्लेषण करताना अख्तरने पाकिस्तानी संघाला धीर देण्याचा प्रयत्न केला. “विश्वचषक स्पर्धेची ही फक्त सुरुवात आहे. भारत-पाकिस्तानच्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत पुन्हा दोन्ही संघ नक्कीच आमने-सामने येतील. याच विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तान आणि भारत पुन्हा सामना खेळतील,” असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला.
नक्की वाचा >> Ind vs Pak: “…लाज वाटते का?” भारताच्या विजयानंतर गौतम गंभीर ठरतोय टीकेचा धनी; जाणून घ्या टीकेमागील ‘विराट कनेक्शन’
पाकिस्तानी संघाला धीर देऊन झाल्यानंतर आपल्या विश्लेषणात्मक व्हिडीओमध्ये शोएब अख्तरने सामन्याचा निकाल एकहाती फिरवणाऱ्या विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला. ५३ चेंडूंमध्ये ८२ धावा करणाऱ्या विराटची ही खेळी त्याच्या टी-२० कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक असल्याचं अनेकांनी म्हटलं. अगदी सामनावीर पुरस्कार मिळवणाऱ्या कोहलीनेही स्वत:च्या खेळीबद्दल हेच मत व्यक्त केलं. विराटच्या बॅड पॅचदरम्यानही त्याच्या बाजूने बोलणाऱ्या शोएब अख्तरने या सामन्यातील विराटच्या कामगिरीला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी खेळी होती असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Pak: “रौफला लगावलेले ते दोन षटकार म्हणजे…”; पाकिस्तानचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीवर फिदा
“जेव्हा इच्छाशक्ती असते तेव्हा त्यामधून विश्वास निर्माण होतो. आणि विश्वास निर्माण झाल्यानंतर त्यातून व्यक्ती अणखीन सक्षम बनून बाहेर निघते. विराट कोहली याचेच उदाहरण आहे,” असं शोएब अख्तरने म्हटलं. “माझ्या मते तो त्याच्या आयुष्याची सर्वोत्तम खेळी खेळून गेला. तो हे करु शकला कारण त्याला याबद्दल विश्वास वाटत होता,” असं शोएब अख्तरने विराटच्या खेळीबद्दल म्हटलं.
नक्की वाचा >> Ind vs Pak: चित्तथरारक विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”
मात्र विराटचं एवढं कौतुक करुन झाल्यानंतर व्हिडीओच्या शेवटाकडे शोएब अख्तरने थेट विराटने टी-२० मधून निवृत्ती घ्यावी अशी इच्छा बोलून दाखवली. “त्याने दमदार पुनरागमन केलं आहे. मात्र त्याने टी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावं असं मला वाटतं कारण त्याने त्याची संपूर्ण ऊर्जा टी-२० क्रिकेटमधून लावू नये या मताचा मी आहे,” असं शोएब अख्तर म्हणाला. इतकच नाही तर त्याने, “आज ज्याप्रकारे खेळी केली आहे तितक्यात ताकदीने खेळल्यास तो एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन शतकं करु शकेल,” असा विश्वासही कोहलीबद्दल बोलताना व्यक्त केला.