T20 World Cup 2024 Team Of The Tournament: भारतीय संघ आता टी-२० फॉरमॅटमधील नवा चॅम्पियन ठरला आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत एकही सामना न गमावता ट्रॉफीवर आपले नाव कोरले. रोहित शर्मा या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बुमराहने १५ विकेट घेत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला. आता आयसीसीने टी-२० वर्ल्ड कप २०२४ साठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे.

हेही वाचा – T20 WC 2024: रोहित ऋषभची ‘ती’ युक्ती ठरली सामन्याचा खरा टर्निंग पॉईंट, १७ व्या षटकापूर्वी नेमकं काय घडलं? चर्चेला आलंय उधाण

टी-२० विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये आयसीसीने ६ भारतीय खेळाडूंचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात ७६ धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीला या संघात संधी मिळाली नाही. संपूर्ण स्पर्धेत कोहलीची बॅट शांत होती आणि अंतिम सामन्यापूर्वी त्याने ७ डावात केवळ ७५ धावा केल्या होत्या. मात्र अंतिम सामन्यात तो पूर्णपणे लयीत दिसला आणि त्याने उत्कृष्ट खेळी खेळली. संघाला गरज असताना विराट मैदानात पाय रोवून उभा राहिला आणि ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली.

हेही वाचा – IND vs SA: “…तेव्हा वाटलं ट्रॉफीचं बाऊंड्रीच्या पलीकडे जातेय”, सूर्याने सांगितली मिलरच्या मॅचविनिंग कॅचमागची गोष्ट; म्हणाला, “आता सगळं…”

ज्या ६ भारतीय खेळाडूंनी संघात स्थान पटकावलं आहे. या सर्वांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहित शर्माने या स्पर्धेत २५७ धावा केल्या. स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने तीन अर्धशतकेही झळकावली. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावांची वादळी खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले.

हेही वाचा – रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या होणार भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार? जय शाह म्हणाले, ‘कॅप्टन्सीचा निर्णय…’

सूर्यकुमार यादवने या स्पर्धेत १९९ धावा केल्या. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने महत्त्वपूर्ण ४७ धावा केल्या होत्या. अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या या दोन्ही खेळाडूंनी बॉल आणि बॅटने चमकदार कामगिरी केली. हार्दिकने १४४ धावा केल्या आणि ११ विकेट घेतले. तर अक्षर पटेलने ९ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, जसप्रीत बुमराह संपूर्ण स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांसाठी मोठा धोका ठरला. अर्शदीप सिंगने २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप टीम ऑफ द टूर्नामेंट

रोहित शर्मा, रहमानउल्ला गुरबाज, निकोलस पूरन, सूर्यकुमार यादव, मार्कस स्टॉइनस, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, राशिद खान, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, फजलहक फारुकी