Shahid Afridi named ICC T20 World Cup 2024 Ambassador : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला पुढील महिन्यात सुरुवात होणार आहे. २ जूनपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून यावेळी ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या विश्वचषकात विजेतेपदासाठी २० संघ सहभागी होणार आहेत. या सर्व संघांची प्रत्येकी ५ गटात विभागणी करण्यात आली आहे. आयसीसीने काही माजी खेळाडूंना ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. आता या यादीत पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शाहिद आफ्रिदीचाही समावेश करण्यात आला आहे.
या यादीत युवराज सिंगचाही समावेश –
आयसीसीने यापूर्वी भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग, युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आणि धावपटू उसेन बोल्ट यांची टी-२० विश्वचषक २०२४ साठी ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली होती. २००७ च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. शाहिद आफ्रिदी या संघाचा एक भाग होता आणि त्याला मालिकावीर म्हणूनही घोषित करण्यात आले होते. २००९ मध्ये पाकिस्तान संघाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते. फायनलमध्ये पाकिस्तानने श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला होता. निर्णायक सामन्यात आफ्रिदीने ४० चेंडूत ५४ धावांची नाबाद खेळी साकारली आणि ४ षटकात २० धावांत एक विकेट घेतली होती. या सामन्यात त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.
शाहिद आफ्रिदीने व्यक्त केला आनंद –
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला टी-२० विश्वचषक २०२४ चा ॲम्बेसेडर बनवल्याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला आहे. तो म्हणाला, “आयसीसी पुरुषांचा टी-२० विश्वचषक ही माझ्या हृदयाच्या अगदी जवळची स्पर्धा आहे. माझ्या पहिल्या हंगामामध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून निवड झाल्यापासून २००९ मध्ये ट्रॉफी जिंकण्यापर्यंत, माझ्या कारकिर्दीतील काही आवडते क्षण या स्पर्धांमधून आले आहेत.” तो म्हणाला, “अलिकडच्या वर्षांत टी-20 विश्वचषक मजबूत होत चालला आहे आणि मी या हंगामाचा भाग होण्यासाठी उत्साहीत आहे. जिथे आपण पूर्वीपेक्षा अधिक संघ, अधिक सामने आणि आणखी रोमांच पाहणार आहोत. त्याचबरोबर ९ जून रोजी होणारा भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”
हेही वाचा – T20 WC 2024 : ‘जसप्रीत बुमराह बर्फातही गोलंदाजी करू शकतो’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला होणार –
१ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. भारतीय संघ ५ जून रोजी आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने टी-२० विश्वचषक मोहिमेची सुरुवात करणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर ९ जून रोजी टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध मोठा सामना खेळणार आहे. यानंतर भारताला १२ जूनला अमेरिका आणि १५ जूनला कॅनडाविरुद्ध खेळायचे आहे.