T20 World Cup 2022 Final, England vs Pakistan Highlights Score Updates: ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. बेन स्टोक्सने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला. मात्र मोक्याच्या क्षणी तीन गडी बाद करणाऱ्या सॅम करनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
दुसऱ्यांदा टी२०चा चषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांनी विजयी संघात कोणताही बदल केला नाही. प्रथम फलंदाजीसाठी पाकिस्तानला इंग्लंडने आमंत्रित केले. पाकिस्तानसाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी २९ धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ १५ धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने २८ चेंडूवर ३२ धावांची संथ खेळी केली. शान मसूदने ३८ तर शादाब खानने २० धावांचे योगदान दिले.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत एकही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. सॅम करनने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीला खेळपट्टीवर तग धरू दिले नाही. त्याने ४ षटकात फक्त १२ धावा देत पाकिस्तानचे ३ फलंदाज बाद केले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा इंग्लंडसमोरील मोठा अडसर दूर केला. त्याने २२ धावा देत दोन गडी बाद केले. ख्रिस जॉर्डननेही २ बळी घेत इंग्लंड संघाला मदत केली. यामुळे पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने ३२ धावा केल्या.
T20 World Cup 2022 Final Highlights , ENG vs PAK Updates: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी२० फायनल हायलाइट्स अपडेट्स
बेन स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने विश्वचषकवर नाव कोरले. टी२० विश्वचषक २०२२ चे विश्वविजेते इंग्लंड ठरले.
इंग्लंड १३८-५
इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर असताना मोईन अली बाद झाला. त्याने १९ धावा केल्या. त्याला मोहम्मद वसीम ज्युनिअर याने त्रिफळाचीत केले.
इंग्लंड १३२-५
मोक्याच्या क्षणी पाकिस्तानला गरज असताना ऐनवेळी शाहीन शाह आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला आणि इंग्लंडला मोठी संधी मिळाली. त्याच्याऐवजी मोहम्मद इफ्तिकारने षटक पूर्ण केले. त्यात एक चौकार आणि एक षटकार स्टोक्सने लगावला.
इंग्लंड ११०-४
नसीम शाहच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स धावबाद होता होता वाचला. पाकिस्तानला अजून विकेट्सची गरज आहे तर इंग्लंडला ३७ चेंडूत ५० धावांची गरज
इंग्लंड ८८-४
पाकिस्तानचा फिरकीपटू शादाब खानने हॅरी ब्रूकला २० धावांवर माघारी धाडले. इंग्लंडने मोक्याच्या क्षणी विकेट गमावत सामना रंजक स्थितीत आणला.
इंग्लंड ८४-४
शादाब खानच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्स मिडॉनला धाव घेण्याच्या नादात हॅरी ब्रूक धावबाद होता होता वाचला. पाकिस्तानला अजूनही विकेट्सची गरज आहे. इंग्लंडला ५२ चेंडूत ५९ धावांची गरज आहे.
इंग्लंड ७९-३
इंग्लंडच्या पहिल्या तीन विकेट्स पडल्यानंतर अष्टपैलू बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक यांनी डाव सावरला असून चांगली धावगतीने ते संघाला पुढे नेत आहेत. ६४ चेंडूत ६७ धावांची इंग्लंडला आवश्यकता आहे. तर पाकिस्तानला विकेट्सची गरज आहे.
इंग्लंड ७१-३
इंग्लंड संघाने पॉवर प्ले मध्ये जॉस बटलरने शानदार फलंदाजी केली आहे. पण मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्याने २६ धावा केल्या. वेगवान गोलंदाज हरिस रौफने त्याला बाद केले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी तीन गडी बाद करत पाकिस्तानला सामन्यात परत आणले.
इंग्लंड ४५-३
फिल सॉल्टच्या रूपाने इंग्लंडला दुसरा धक्का बसला. त्याने १० धावा केल्या आणि त्याला हरिस रौफने बाद केले.
इंग्लंड ३२-२
पाकिस्तानने ठेवलेल्या १३८ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतलेल्या इंग्लंडला अॅलेक्स हेल्स रुपात पहिला धक्का बसला. अवघी १ धाव काढून तो शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला.
इंग्लंड ७-१
पाकिस्तानने ठेवलेल्या १३८ धावांचा पाठलाग करण्यासाठी इंग्लंडचे सलामीवीर कर्णधार जॉस बटलर आणि अॅलेक्स हेल्स मैदानात आले आहेत.
इंग्लंड ०-०
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना केवळ १३७ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. विश्वचषक जिंकण्यासाठी इंग्लंडला १३८ धावा करायच्या आहेत.
पाकिस्तान १३७-८
मोहम्मद वसीम केवळ ४ धावा करून बाद झाला. त्याला ख्रिस जॉर्डनने बाद केले.
पाकिस्तान १३१-८
इंग्लंडच्या धारदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानला तग धरणे अशक्य होत आहे. मोहम्मद नवाज केवळ ५ धावा करून बाद झाला आहे.
पाकिस्तान १२९-७
धावगती वाढवण्याच्या नादात शादाब खान २० धावा करून बाद झाला. त्याला ख्रिस जॉर्डनने बाद केले.
पाकिस्तान १२३-६
शान मसूद आणि शादाब खान यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती पण मोठा फटका मारण्याच्या नादात शान मसूद ३८ धावा करून बाद झाला. त्याला सॅम करनने बाद केले.
पाकिस्तान १२१-५
किमान १६० धावांपर्यंत पोहचण्यासाठी पाकिस्तानला शेवटच्या पाच षटकात मोठ्या फटक्यांची गरज आहे.
पाकिस्तान १०८-४
बेन स्टोक्सने इफ्तिखार अहमदला बाद केले. त्याला भोपळाही फोडता आला नाही. पाकिस्तान संघ अडचणीत सापडला आहे.
पाकिस्तान ८५-४
आदिल राशिदने बाबर आझमला बाद करत निर्धाव षटक टाकले आणि इंग्लंड संघाला मजबूत स्थितीत नेण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे नेले.
पाकिस्तान ८५-३
स्वतः च्याच गोलंदाजीवर झेल घेत आदिल राशिदने कर्णधार बाबर आझमला ३२ धावांवर बाद केले. त्याने टी२० कारकिर्दीत चौथ्यांदा त्याला बाद केले.
पाकिस्तान ८४-३
https://twitter.com/ICC/status/1591717912040984576?s=20&t=cdFwZ1js1ZJ4H7XyokMr9Q
पाकिस्तानच्या इनिंगची दहा षटके झाली असून धावसंख्या मात्र फार कमी आहे. बाबर आझमला धावगती वाढवणे गरजेचे आहे. इंग्लंडच्या संघाने कसून गोलंदाजी केली आहे. मोठे फटके मारण्याची संधी पाकिस्तानी फलंदाजांना त्यांनी दिली नाही.
६८-२
https://twitter.com/ICC/status/1591715943582932992?s=20&t=zrpcaot1lunAzyOgZ29bwQ
आठव्या षटकात पाकिस्तानचे अर्धशतक पूर्ण केले आहे. बाबर आझम आणि शान मसूद सध्या खेळपट्टीवर इंग्लंड संघांच्या गोलंदाजांचा सामना करत आहेत.
पाकिस्तान ५०-२
पाकिस्तानचा तडाखेबंद फलंदाज मोहम्मद हॅरिस अवघ्या ८ धावा करून बाद झाला. त्याला आदिल राशिदने बाद केले.
पाकिस्तान ४५-२
इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो त्यांच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. इंग्लंडने कसून गोलंदाजी करत पाकिस्तानी फलंदाजांना जखडून ठेवले आहे. पॉवर प्ले मध्ये पाकिस्तानची सावध सुरुवात झाली आहे. बाबर आझम सध्या खेळपट्टीवर टिकून आहे.
पाकिस्तान ३९-१
पाकिस्तानला मोठा धक्का बसला. मोहम्म्म्द रिझवान १५ धावा करून बाद झाला. सॅम करनने त्याला त्रिफळाचीत केले.
पाकिस्तान २९-१
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी सामन्यात सावध सुरुवात केली आहे. खेळपट्टी पहिल्या दोन षटकानंतर फलंदाजीला साथ देणारी आहे. बेन स्टोक्स आणि ख्रिस वोक्स यांनी दोघांना मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही.
पाकिस्तान १२-०
बेन स्टोक्स सामन्याची सुरुवातच नो-बॉल टाकून केली. पण मोहम्मद रिझवानला याचा फायदा उठवता आला नाही.
पाकिस्तान ४-०
पाकिस्तान संघाचे कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान खेळपट्टीवर आले आहेत. टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे.
पाकिस्तान ०-०
टी२० विश्वचषक २०२२ चा समारोप सोहळा सामना सुरु होण्यापूर्वी सुरु असून त्यात सर्व देशांचे ध्वज मैदानात आले आहेत. यात सर्व देशांच्या प्रतिनिधित्व करणारे काही कलाकार देखील सादरीकरण करत आहेत. त्यात भारतीय वंशाच्या १३ वर्षीय जानकी ईश्वरचा देखील समावेश आहे.
टी२० विश्वचषक २०२२ मधील अंतिम सामन्यात शेवटचे दोन्ही संघांचे राष्ट्रगीत होणार आहे. त्याआधी आयसीसीकडून छोटासा कार्यक्रम होणार आहे.
T20 World Cup 2022 Final Highlights , ENG vs PAK: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी२० फायनल हायलाइट्स
टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले.