T20 World Cup 2022 Final, England vs Pakistan Highlights Score Updates: ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी२० विश्वचषकाचा आज समारोप झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम फेरीतील सामना रविवारी (१३ नोव्हेंबर) रोजी ऐतिहासिक मेलबर्न मधील एमसीजी म्हणजेच मेलबर्न क्रिकेट मैदानवर संपन्न झाला. टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले. बेन स्टोक्सने झुंजार अर्धशतकी खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला. मात्र मोक्याच्या क्षणी तीन गडी बाद करणाऱ्या सॅम करनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

दुसऱ्यांदा टी२०चा चषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या दोन्ही संघांनी विजयी संघात कोणताही बदल केला नाही. प्रथम फलंदाजीसाठी पाकिस्तानला इंग्लंडने आमंत्रित केले. पाकिस्तानसाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी २९ धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ १५ धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने २८ चेंडूवर ३२ धावांची संथ खेळी केली. शान मसूदने ३८ तर शादाब खानने २० धावांचे योगदान दिले.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत एकही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. सॅम करनने टी२० विश्वचषक अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजीला खेळपट्टीवर तग धरू दिले नाही. त्याने ४ षटकात फक्त १२ धावा देत पाकिस्तानचे ३ फलंदाज बाद केले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा इंग्लंडसमोरील मोठा अडसर दूर केला. त्याने २२ धावा देत दोन गडी बाद केले. ख्रिस जॉर्डननेही २ बळी घेत इंग्लंड संघाला मदत केली. यामुळे पाकिस्तानला २० षटकात ८ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने ३२ धावा केल्या.

Live Updates

T20 World Cup 2022 Final Highlights , ENG vs PAK Updates: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी२० फायनल हायलाइट्स अपडेट्स

12:57 (IST) 13 Nov 2022
ENG vs PAK: पाकिस्तान-इंग्लंड संघात कोणताही बदल नाही

उपांत्य फेरीतील सामन्यात जे संघ खेळले होते तेच संघ पाकिस्तान आणि इंग्लंड यांनी ठेवले आहेत. विजयी संघात कोणताही बदल दोन्ही संघांनी केलेला नाही.

12:53 (IST) 13 Nov 2022
ENG vs PAK: इंग्लंडने जिंकली नाणेफेक

इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

12:33 (IST) 13 Nov 2022
ENG vs PAK: पिच रिपोर्ट

इंग्लंड किंवा पाकिस्तान, दोनही संघांमध्ये लेग स्पीन गोलंदाज आहे. शादाब खान आणि आदिल रशीद संघाकरिता फार महत्वाची कामगिरी पार पाडत आहेत. अंतिम सामन्यात कोणता लेग स्पीन गोलंदाजाला यश मिळणार हे थोड्याच वेळात सामन्यात कळणार आहे.. पावसाळी हवामान कायम राहणार असल्याने मैदान कर्मचाऱ्यांनी फलंदाजीकरिता पोषक खेळपट्टी बनवायचा प्रयत्न केला तरी काही ना काही मदत वेगवान गोलंदाजांना होणार आहेच. या खेळपट्टीवर १७० धावांचे लक्ष हे पुरेसे असणार आहे. जो कोणी संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय' घेणार आहे.

12:04 (IST) 13 Nov 2022
ENG vs PAK: १९९२ च्या इतिहासाची पाकिस्तान संघ पुनरावृत्ती करणार की इंग्लंड संघ बदला घेणार?

१९९२ साली इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाने चांगली कामगिरी करत उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा आणि अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव केला होता. त्याची पुनरावृत्ती बाबर आझमचा संघ करणार की इंगलंड ३० वर्षभरापूर्वीचा बदला घेणार याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

11:58 (IST) 13 Nov 2022
ENG vs PAK: कोण ठरणार टी२० विश्वचषकाचा मानकरी

टी२० विश्वचषक २०२२ च्या विजेतेपदाचा दावेदारीसाठी इंग्लंड आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांमध्ये भिडणारआहेत. जगभरातील क्रिकेटप्रेमींना कोण ठरणार टी२० विश्वचषकाचा मानकरी याची उत्सुकता लागली आहे आहे.

 

T20 World Cup 2022 Final Highlights , ENG vs PAK: इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान टी२० फायनल हायलाइट्स

टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात आज मेलबर्न येथे खेळवला गेला त्यात इंग्लंडने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभव करत टी२० विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरले.