पाकिस्तानचा संघ यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. पाकिस्तानने २००९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर मात्र पाकिस्तानला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. परंतु पाकिस्तानच्या संघाने गेल्या दोन-तीन वर्षांत ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली असून त्यांना पराभूत करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियातील विश्वचषक यांचे खास नाते आहे. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाचे पाकिस्तानने विजेतेपद मिळवले होते. या कामगिरीवरून प्रेरणा घेत पाकिस्तानचा आता १३ वर्षांपासूनचा ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बलस्थाने : मोहम्मद रिझवान आणि कर्णधार बाबर आझम यांची उत्कृष्ट फलंदाजी, तसेच गोलंदाजांची मजबूत फळी ही पाकिस्तान संघाची बलस्थाने आहेत. इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांसारखे अष्टपैलूही सामन्याचे चित्र पालटण्यात सक्षम आहेत. ऑस्ट्रेलियातील गोलंदाजांना पूरक अशा खेळपट्टय़ांवर शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद वसिम, हॅरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद हसनैन यांसारख्या गोलंदाजांचा सामना करणे हे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांपुढील मोठे आव्हान असेल.

जेतेपद : एकदा (२००९)

* कच्चे दुवे : रिझवान आणि आझम वगळल्यास पाकिस्तानच्या फलंदाजांना अलीकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. रिझवान आणि आझम हे सलामीवीर लवकर माघारी परतल्यास इतर फलंदाजांना संघाचा डाव सावरणे अवघड जाते. यासह गेल्या काही काळात पाकिस्तानला दुखापतींचा फटका बसला आहे. तारांकित वेगवान गोलंदाज शाहीनला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आले असले, तरी त्याच्या तंदुरुस्तीबाबत पूर्णपणे खात्री नाही. त्यामुळे आफ्रिदीचा पर्यायही संघाला तयार ठेवावा लागेल.

* गेल्या विश्वचषकातील कामगिरी : उपांत्य फेरी

* संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शान मसूद, आसिफ अली, हैदर अली, हॅरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वसिम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान कादिर.