१३ नोव्हेंबरला मेलबर्न येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी२० विश्वचषकासाठीचा अंतिम सामना रंगला. या सामान्यामध्ये इंग्लंडच्या संघाने सुरुवातीपासूनच शानदार प्रदर्शन केले. इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनीही हा निर्णय सार्थ ठरवला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत एकही पाकिस्तानी फलंदाजाला मोठी धावसंख्या करू दिली नाही. इंग्लंडने पाकिस्तानला निर्धारित २० षटकात ८ बाद १३७ धावांवर रोखले.
पाकिस्तानने इंग्लंडला १३७ धावांचे आव्हान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात जबरदस्त धक्का बसला. भारताविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी करणारा अॅलेक्स हेल्सला शाहीन आफ्रिदीने बाद केले. यानंतर फिल सॉल्ट, जोस बटलरही एकामागोमाग एक बाद झाले. मात्र, अनुभवी बेन स्टोक्सने हॅरी ब्रुकसह ३९ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. मोईन अलीनेही १३ चेंडूवर १९ धावांचे योगदान दिले. स्टोक्सनेच आपले अर्धशतक पूर्ण करून संघासाठी विजयी धाव काढली. अशाप्रकारे इंग्लंडने एक षटक राखून अंतिम सामन्यात विजय मिळवला.
याचदरम्यान, भारताचे माझी खेळाडू आणि फिरकीपटू निखिल चोप्रा यांनी भारतीय संघाचे कान टोचले आहेत. ते म्हणाले टी२० मधील प्रदर्शन सुधारण्यासाठी भारतीय संघाने इंग्लंडकडून प्रेरणा घ्यावी. निखिल म्हणाले की, पुढील विश्वचषकासाठी भारताने रोडमॅप तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांनी इंग्लंडकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे.
निखिल पुढे म्हणाले की, “२०१५ साली इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही. मात्र यानंतर त्यांनी शानदार वापसी केली आहे. या स्पर्धेत कसे खेळायचे आहे हे त्यांनी आधीच ठरवले होते. भलेही ते जिंकले किंवा हरले, मात्र त्यांच्या फलंदाजांनी नेहमीच एक रोडमॅप सेट करण्याचा प्रयत्न केला आहे.” निखिल यांच्या या वक्त्यावरून असे लक्षात येईल की ते भारतीय संघाला फलंदाजीमध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगत आहेत. फलंदाजीच्या बाबतीत भारतीय संघाने इंग्लंडचा आदर्श ठेवावा असे त्यांना वाटते.
दरम्यान, टी२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा दहा गडी राखून पराभव केल्यानंतर निखिल चोप्रा यांनी हे वक्तव्य केले. या सामन्यात भारताने निर्धारित २० षटकात सहा विकेट गमावत १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्णधार जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्सच्या दमदार फटकेबाजीमुळे इंग्लंडने एकही गडी न गमावता अवघ्या १६ षटकांत हे लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला होता.