टीम इंडियाने ऑस्ट्रेलियातील मिशन टी२० विश्वचषकाला शानदार सुरुवात केली. पहिल्या अनौपचारिक सराव सामन्यात त्यांनी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा १३ धावांनी पराभव केला. पण आज त्याच संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या अनौपचारिक सराव सामन्यात टीम इंडियाला ३६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सात गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावाच करू शकला. भारताकडून कर्णधार राहुलने सर्वाधिक ७४ धावा केल्या. राहुलशिवाय बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली. गोलंदाजांमध्ये अश्विनला तीन आणि हर्षलला दोन बळी मिळाले. या सामन्यात सूर्यकुमार यादव, विराट कोहली आणि युझवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली होती.
अर्शदीप सिंगने आपल्या पहिल्याच षटकात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र यानंतर निक हॉब्सन आणि डार्सी शॉर्ट यांनी मजबूत भागीदारी रचली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतके ठोकली. पण हर्षलने हॉबसनला बाद केल्यावर त्याच षटकात शॉर्टही धावबाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर अश्विनने एकाच षटकात तीन बळी घेत भारताला सामन्यात पुनरागमन केले. यानंतर अर्शदीपने १८व्या षटकात ८ धावा दिल्या आणि भुवीने १९व्या षटकात ७ धावा दिल्या.
हर्षलने शेवटच्या षटकात १३ धावा देत आणखी एक गडी बाद केला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि ऋषभ पंत ९ धावांवर बाद झाला. यानंतर दीपक हुडा (६), हार्दिक (१७), अक्षर (२) आणि दिनेश कार्तिक (१०) धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. प्लेइंग इलेव्हनचा भाग असलेला रोहित शर्मा फलंदाजीला आला नाही.
हेही वाचा : Kamalpreet Kaur: उत्तेजक सेवनप्रकरणी भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत कौरवर तीन वर्षांची बंदी
यानंतर भारतीय संघाला दोन अधिकृत सराव सामनेही खेळायचे आहेत. हे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध अनुक्रमे १७ आणि १९ ऑक्टोबरला होणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया २३ ऑक्टोबरला वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना खेळणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना पाकिस्तान विरुद्ध मेलबर्न येथे होणार आहे.