आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने नुकतीच फलंदाजी आणि गोलंदाजीची क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये ‘मिस्टर ३६०’ सूर्यकुमार यादवने टी२० क्रमवारीत आपले अव्वलस्थान कायम राखले, तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता सूर्या आणि रिझवानमध्ये ३९ गुणांचा फरक आहे. याचा अर्थ आता रिजवानसाठी सूर्याला हरवून मागे टाकणे खूप कठीण जाणार आहे.
सूर्यकुमार यादव याच्याबरोबर भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि उपकर्णधार केएल राहुल यांना क्रमवारीत फायदा झाला आहे. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली टी२० विश्वचषक २०२२च्या हंगामात उत्तम फॉर्ममध्ये आहे. यामुळे त्याने आयसीसी टी२० क्रमवारीत ११वे स्थान कायम राखले आहे. अर्शदीपला एका स्थानाचा फायदा झाला असून त्याने गोलंदाजीत २३वे स्थान गाठले आहे. या स्पर्धेत अर्शदीपने त्याच्या गोलंदाजींने चाहत्यांना भूरळ घातली आहे. त्याने पहिलाच टी२० विश्वचषक खेळताना ५ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.
टीम इंडियाचा सलामीवीर राहुल यालाही एका स्थानाचा लाभ झाला असून तो आता १६व्या स्थानावर आहे. दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याला एका स्थानाचा फायदा झाला आहे. तो १४वरून १३व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा १८व्या स्थानावर कायम आहे.
त्याचबरोबर गोलंदाजी क्रमवारीत श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा जगातील अव्वल क्रमांकाचा टी२० गोलंदाज बनला आहे. यानंतर राशिद खान दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय जोस हेजलवूडला तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा तबरेझ शम्सी चौथ्या क्रमांकावर आहे, तर अॅडम झाम्पा पाचव्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू आर. अश्विन याला ५ स्थानांचा फायदा झाला. त्याने थेट १३व्या स्थानावर उडी घेतली आहे. गोलंदाजीत भारताचा एकही खळाडू पहिल्या दहामध्ये नाही. भुवनेश्वर कुमार १२व्या स्थानावर कायम आहे, तर इंग्लंडचा सॅम करन सातव्या स्थानावर आहे.