टी-२० विश्वचषक २०२२ मधील भारत विरुद्ध झिंम्बाब्वे संघात रविवारी खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया मेलबर्नमध्ये पोहोचली आहे. अशात माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू रिकी पॉन्टिंगने एक वक्तव्य केले आहे. भारताला टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल, तर विराट कोहलीने खेळपट्टीवर टिकने आवश्यक आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंग यांनी व्यक्त केले आहे.
विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्याने टॉप ऑर्डर कोसळल्यानंतर भारताला वाचवले आणि अनेक धावा केल्या आहेत. चार डावांत २२० धावा करून तो सध्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. भारताचा माजी कर्णधार कोहली टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
पॉन्टिंगने पत्रकारांना सांगितले की, “गेल्या काही महिन्यांपासून मी रेकॉर्डवर आहे आणि विराटसह भारताने अशा मोठ्या स्पर्धेत यावे. हे मला कसे महत्त्वाचे वाटले याबद्दल बोलताना तो म्हणाला, जेव्हा तुम्ही यासारख्या मोठ्या इव्हेंटमध्ये येता, तेव्हा तुम्हाला तुमच्या अनुभवी स्टार खेळाडूंची गरज असते. ते मोठ्या सामन्यामध्ये खेळताना टिकले की काय होते, हे आपण पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पहिल्यांदाच पाहिलं आहे.”
भारताच्या सलामीच्या सामन्यात कोहलीच्या ५३ चेंडूत नाबाद ८२ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने अंतिम षटकात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार विकेट राखून विजय मिळवला. केवळ कोहलीच खेळपट्टीवर टिकून भारताला विजय मिळवून देऊ शकतो, असा मला विश्वास असल्याचे पॉन्टिंग पुढे म्हणाला.
पॉन्टिंगने पुढे अधोरेखित केले की भारताने अद्याप त्यांचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलेले नाही आणि दोन सामन्यांमध्ये कोहली खरोखरच चांगला खेळला आहे. पॉन्टिंग पुढे म्हणाला,”भारताने अद्याप सर्वोत्तम कामगिरी केली नसावी, पण विराटने काही सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. आता तो स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. मला वाटते की, भारताला प्रगती करायची असेल आणि जिंकायचे असेल तर त्यांना विराटची गरज आहे. कोहली खेळपट्टीवर टिकून चांगला खेळण्याची गरज आहे.”