India vs South Africa final match weather report : दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला आणि भारताने इंग्लंडला पराभूल करुन टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना २९ जून रोजी केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे होणार आहे. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीच्या सामन्याप्रमाणेच अंतिम सामन्यावरही पावसाचे सावट आहे. मात्र, एक चांगली गोष्ट म्हणजे विजेतेपदाच्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, पण राखीव दिवशी पण पावसामुळे व्यत्यय आणला तर काय होणार? विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व ७ सामने जिंकले आहेत. भारताचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेने खेळलेले सर्व ८ सामने जिंकले. अशा स्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ट्रॉफीची लढत रोमांचक होण्याची शक्यता आहे. प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा संघ कोणत्याही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतासमोर दिसणार आहे.

बार्बाडोसमधील हवामान अहवाल काय आहे?

टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या Accuweather च्या अहवालानुसार, शनिवारी (२९ जून) ढगाळ वातावरण असेल. एवढेच नाही तर वारा वाहणार असून तो दमट असणार आहे. पाऊस आणि वादळाचीही शक्यता आहे. दिवसाच्या सुरुवातीला ९९% ढग आहे आणि वादळाची ४७% शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता सामना सुरू होईल. त्याच वेळी, भारतात हा सामना रात्री ८ वाजल्यापासून पाहता येईल.

हेही वाचा – IND vs ENG : रोहित-सूर्याची फलंदाजी, अक्षर-कुलदीपची फिरकी, ‘या’ तीन टर्निंग पॉइंट्समुळे भारताने इंग्लंडवर केली मात

राखीव दिवशी पण पावसाने व्यत्यय आणला तर कसा निवडला जाणार विजेता –

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामन्यासाठी आयसीसीने ३० जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. सर्वप्रथम २९ जून रोजी होणारा सामना आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. जर हा सामना २९ तारखेला पडू शकला नाही, तर तो राखीव दिवशी खेळला जाईल. राखीव दिवशी, सामना २९ जून रोजी जिथे थांबला होता तिथून पुढे सुरू होईल. पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे राखीव दिवशीही सामना खेळला गेला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.

हेही वाचा – VIDEO : सचिन-रिचर्ड्स, राहुल द्रविड यांच्यानंतर ‘बेस्ट फिल्डर मेडल’ देण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये पोहोचलं तरी कोण?

भारतीय संघाने एकदा पटकावलयं जेतेपद –

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सध्याच्या टी-२० विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली आहे. टीम इंडियाने या विश्वचषकात सलग ७ सामने जिंकले आहेत. याआधी टीम इंडियाने कोणत्याही टी-२० विश्वचषकाच्या एकाच हंगामात इतके सामने जिंकले नव्हते. भारतीय संघाने २००७ आणि २०१४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला होता. टी-२० विश्वचषक २००७ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेने एकदाही जेतेपद पटकावलेले नाही.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If the india vs south africa final match is called off due to rain which team will be the winner in t20 world cup 2024 vbm