IND v AFG Match Highlights: भारताच्या फलंदाजांची विस्फोटक फलंदाजी, रोहित शर्माची चालाख कॅप्टन्सी आणि बुमराह-कुलदीपच्या भेदक गोलंदाजीसह भारताने अफगाणिस्तानला ऑल आऊट करत ४८ धावांनी विजय मोठा मिळवला. सामन्याच्या सुरूवातीला भारताचा डाव गडबडला खरा पण प्रत्येक फलंदाजाने दिलेल्या धावांच्या योगदानाने भारताने चांगली धावसंख्या उभारली. पण अफगाणिस्ताननेही भारताच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. यानंतर आलेल्या जागतिक क्रमवारीतील नंबर वन टी-२० फलंदाज असलेल्या भारताच्या सूर्यकुमार यादवने आपला क्लास दाखवत एक झंझावाती अर्धशतकी खेळी केली. तर हार्दिकसोबतची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. तर बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन करत ७ धावा देत ३ विकेट्ससह सर्वाेत्कृष्ट गोलंदाजी केली. तर अक्षर पटेल, जडेजा आणि कुलदीपसारख्या गोलंदाजांनी त्याला साथ दिली.

अर्शदीपने स्पेलमधील अखेरच्या दोन षटकांमध्ये तीन विकेट्स घेत संघाचा विजय अधिक सोपा केला. अर्शदीपच्या सामन्यातील अखेरच्या चेंडूवर नूर अहमदला झेलबाद करत अफगाणिस्तानला ऑल आऊट केले. जसप्रीत बुमराहनंतर अर्शदीपनेही ३ विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संथ सुरुवातीनंतर भारताने तिसऱ्या षटकातच रोहितची (८) विकेट गमावली, जो फजलहक फारुकीच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. ऋषभ पंतने फारुकीला येताच चौकार मारला, तर कोहलीने नवीन उल हकला आयकॉनिक षटकार मारून स्वागत केले.

हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण

भारताच्या गोलंदाजांसमोर पत्त्यांसारखा कोसळला अफगाणिस्तानचा डाव

अफगाणिस्तानचे फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर टिकू शकले नाहीत आणि झटपट माघारी परतले. जसप्रीत बुमराहने दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रहमानउल्ला गुरबाजने १ तर हजरतुल्ला झाझाईने २ धावा केल्या. टी-२० विश्वचषकात पहिला सामना खेळणाऱ्या कुलदीप यादवने गुलबदिन नायबला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अजमतुल्ला उमरझाईला रवींद्र जडेजाने बाद केले. त्याने २६ धावा केल्या. मोहम्मद नबी १४ धावा करत माघारी परतला. अफगाणिस्तान संघासाठी एकही खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे संघाला २० षटकांत केवळ १३४ धावा करता आल्या.

हेही वाचा – अफगाणिस्तानला ऑल आऊट करत भारताचा दणदणीत विजय, सुपर एटमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी

भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने तीन विकेट घेत चार षटकात केवळ 7 धावा दिल्या. अर्शदीप सिंगनेही तीन विकेट घेतले. त्याने शेवटच्या चेंडूवर नूर अहमदची विकेट घेतली. कुलदीप यादवने दोन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

पंतने नबीवर सलग तीन चौकार लगावले. मात्र, नवीनने त्याचा झेल सोडत त्याला जीवदान दिले. पॉवर प्लेमध्ये भारताने एक बाद ४७ धावा केल्या होत्या. मात्र पंत पुढच्याच षटकात रशीदच्या फिरकीवर पायचीत झाला. त्याने ११ चेंडूंत चार चौकारांसह २० धावा केल्या. पुढच्या षटकात रशीदकडून फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली (२४) लाँग ऑफ बाऊंड्रीवर नबीकरवी झेलबाद झाला. शिवम दुबेने (१०) नूर अहमदवर षटकार तर सूर्यकुमार यादवने रशीदला षटकार लगावला. त्यानंतर रशीदच्या गोलंदाजीवर शिवम दुबे एक षटकार लगावत पायचीत झाला.

हेही वाचा – Team India 2024-25 Schedule: टी-२० वर्ल्डकपनंतर कसं असणार भारताचं वेळापत्रक? BCCI ने केलं जाहीर; बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड…

सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट खेळी केली आणि त्याच्यामुळेच टीम इंडिया मोठी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरली. तर त्याला हार्दिक पांड्याने चांगली साथ दिली. सूर्याने २८ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह ५३ धावा केल्या आणि हार्दिकने २४ चेंडूत ३२ धावा केल्या. सूर्यकुमार, हार्दिक पंड्या आणि जडेजा बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या अक्षर पटेलने हुशारीने खेळी करत अखेरच्या षटकात महत्त्वपूर्ण १४ धावा केल्या. यासह भारताने १८१ धावांची धावसंख्या गाठल्या. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतले.