Mohammad Siraj took Nitish Kumar catch video viral : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ मधील २५वा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा हा निर्णय अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेत योग्य ठरवला. दरम्यान या सामन्यात मोहम्मद सिराजने सीमारेषेवर उत्कृष्ट झेल घेतला, ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर त्याने घेतलेल्या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सिराजने सीमारेषेवर घेतला अप्रतिम झेल –
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी करत फॉर्मात दिसत असलेल्या नितीशकुमारला पॅव्हेलियनमध्ये पाठवून अमेरिकेला पाचवा धक्का दिला. त्यामुळे अमेरिकेने ८१ धावांत पाच विकेट गमावल्या. नितीशने २३ चेंडूत २७ धावांची खेळी खेळली. अर्शदीपच्या चेंडूवर त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र मोहम्मद सिराजने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेत त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे, तर प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेने भारतासमोर विजयासाठी १११ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अप्रतिम गोलंदाजी करत अमेरिकेच्या फलंदाजांवर दडपण आणले. अमेरिकेच्या संघाला २० षटकांत आठ गडी बाद ११० धावाच करता आल्या. भारताकडून अर्शदीपने चार, हार्दिक पांड्याने दोन आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि पहिल्याच षटकात संघाने दोन गडी गमावले. यामुळे संघ दडपणाखाली आला आणि पॉवरप्लेमध्ये त्यांना केवळ १८ धावाच करता आल्या. मात्र, स्टीव्हन टेलर आणि नितीश कुमार यांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे संघाची धावसंख्या १०० च्या पुढे जाऊ शकली. अमेरिकेकडून नितीश कुमारने २३ चेंडूंत दोन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक २७ धावा केल्या, तर टेलरने ३० चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने २४ धावा केल्या.