IND vs BAN K L Rahul: टी २० विश्वचषकात खराब खेळीमुळे के. एल. राहुल टीकेचा धनी ठरला होता. अगदी क्रिकेटप्रेमींपासून ते माजी खेळाडूंपर्यंत अनेकांनी के. एल. राहूलला संघातून ब्रेक देण्याचा पर्याय सुचवला होता. यावेळी टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने मात्र भारतीय उपकर्णधार के. एल. राहुलची पाठराखण केली होती. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत राहुलने आतापर्यंत केवळ २२ धावा केल्या असल्या, तरी बुधवारी बांगलादेशविरुद्ध खेळताना सलामीसाठी आमच्याकडे दुसरा पर्यायच नाही असेही द्रविडने स्पष्ट केले. आजच्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात के. एल. राहुलने द्रविडचा हाच विश्वास सार्थ ठरवला आहे.
के एल राहुल विषयी काय म्हणाला होता राहुल द्रविड?
के. एल राहुल विषयी राहुल द्रविड म्हणाला की, “राहुल गुणी फलंदाज आहे. यापूर्वी अनेकदा राहुलने आपली गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध केली आहे. टी -२० क्रिकेटमध्ये असे अपयश कधी ना कधी प्रत्येकाच्या वाटेला येतच असते. विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत सलामीला खेळणे सोपे नसते. आगामी सामन्यांत राहुलला लय गवसेल. आपल्याला राहुलची क्षमता ठाऊक आहे”
राहुल पुढे म्हणाला की, विराट कोहलीचा जेव्हा फॉर्म बिघडत होता तेव्हा कोहलीच्या बाबतही अशीच चर्चा होत होती; पण,आज कोहलीला लय गवसल्यावर चित्र बदलले आहे. राहुलबाबतही असेच घडेल. आजच्या भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात के.एल राहुलचा खेळ मंद गतीनेच सुरु झाला होता. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये राहुलने पाच बॉल एकही धाव घेतली नाही मात्र नंतर राहुलने अशी फटकेबाजी सुरु केली की अवघ्या ३१ चेंडूंमध्ये राहुलने अर्धशतक झळकावले.
टी २० विश्वचषकात के. एल. राहुलची खेळी निराशाजनकच होती भारत विरुद्ध पाकिस्तान (०), भारत विरुद्ध नेदरलँड (९) ते नुकत्याच पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यातही (९) नंतर आजच्या सामन्यात पुन्हा कमी धावांची हॅट्रिक करून के. एल. राहुल तंबूत परतणार का असा प्रश्न होता मात्र राहुलने ही दुर्दैवी हॅट्रिक टाळली आहे.
दरम्यान, आज सुनील गावस्कर यांनीही के. एल. राहुलच्या गमावलेल्या फॉर्मबद्दल भाष्य केले आहे. राहुलला स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास नाही तोच अविश्वास त्याच्या खेळात दिसून येत आहे असे गावस्कर यांनी म्हंटले होते मात्र आजच्या राहुलच्या खेळीने त्याचा हरवलेला फॉर्म व आत्मविश्वास पुन्हा मिळवला असे म्हणता येईल.