ICC T20 World Cup IND vs BAN: टी २० विश्वचषकातील भारताचा हुकुमी एक्का सूर्यकुमार यादव याने आयसीसी टी २० विश्वचषकातील पुरुष गटात मानाचे स्थान मिळवले आहे. भारताच्या नेदरलँड व दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामन्यांमध्ये सूर्यकुमारने चमकदार खेळी दाखवली होती. दोन सामन्यांमध्ये सलग दोन अर्धशतकं ठोकून सूर्यकुमारने भारताची बुडती नाव सावरून धरली होती. सूर्यकुमारने नेदरलँड विरुद्ध सामन्यात २५ चेंडूंमध्ये ५१ धावा तर दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्यात ४० चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या होत्या. या धावांच्या सरासरीसह आता सूर्यकुमार टी २० क्रिकेटमधील फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
मागील वर्षीच्या सामन्यांनंतर ४ सप्टेंबर २०२१ पासून पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान रँकिंगमध्ये टॉपला होता मात्र टी २० विश्वचषकातील दोन सामन्यांमुळे सूर्यकुमारने २३ व्या स्थानावरून थेट पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ही महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये आजवर केवळ विराट कोहलीलाच हा मान मिळाला होता. कोहलीनंतर आता सूर्यकुमारनेही ही कामगिरी करून दाखवली आहे. २०१४ ते २०१७ दरम्यान तब्बल १०१३ दिवस विराट कोहली या फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉपला होता. सूर्यकुमारचे रेटिंग पॉईंट ८६३ असून भारतीय खेळाडूंच्या यादीतही तो दुसऱ्या स्थानी आहे.
दरम्यान, आज भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून १८५ चे मोठे टार्गेट उभे केले आहे. यामध्ये विराट कोहलीसह सूर्यकुमार यादवचे अर्धशतक समाविष्ट आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीनेही टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाज होण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. विराटने सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकलं आहे.