टी२० विश्वचषकात ग्रुप बी मध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात ॲडलेडमध्ये सामना खेळला गेला. अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा बांगलादेशवर पाच धावांनी निसटता विजय झाला असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. डकवर्थ लुईसच्या नियमानुसार धावांचे लक्ष हे १६ षटकात १५१ करण्यात आले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. विराट कोहलीला टी२० विश्वचषक २०२२ मध्ये दुसऱ्यांदा सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने २० षटकांत ६ बाद १८४ धावा केल्या. बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी १८५ धावा करायच्या होत्या. धावांचा पाठलाग करताना लिटन दास याने तुफानी खेळी करत करत २७ चेंडूत ६० धावा केल्या. त्यामुळे एकवेळेस असे वाटत होते की, बांगलादेश हा सामना भारताच्या हातून काढून घेणार. पण पावसाने मध्ये अडथळा आणला आणि तो भारतासाठी फायद्याचा ठरला.
अर्धशतक करून खेळत असलेल्या दास याला पावसानंतरच्या पहिल्याच षटकात केएल राहुलने थेट थ्रो करत धावबाद केले. त्यानंतर बांगलादेशचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. शमीने शांतोला बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज राहिलेल्या अर्शदीपने बांगलादेशचा कर्णधार शाकीब व उपकर्णधार अफीफ यांना एकाच षटकात बाद करत बांगलादेशच्या विजयाच्या आशांना सुरुंग लावला. तळाच्या फलंदाजांना मोक्याच्या क्षणी मोठे फटके न खेळू देता भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला १४५ धावांवर रोखत संघाला विजय मिळवून दिला. भारतासाठी अर्शदीप व हार्दिकने दोन तर शमीने एक बळी मिळवला.
तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला अपयश आले. तो सुरुवातीपासूनच चाचपडत खेळताना दिसला. बाद होण्यापूर्वी त्याने ८ चेंडूवर २धावा केल्या. या विश्वचषकात आतापर्यंत शांत असलेल्या केएल राहुलने या सामन्यात तुफान कामगिरी केली. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३२ चेंडूवर ५० धावा केल्या. केएल राहुलने थोडा वेळ घेत नंतर मोठे फटके मारण्यास सुरुवात केली त्याला विराट कोहली चांगली साथ मिळाली. राहुलने सलग तीन सामन्यातील अपयश धुवून काढत अर्धशतकी खेळी केली. मात्र अर्धशतकी खेळीनंतर शकिबने त्याला बाद केले. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत आक्रमक ३० धावांची खेळी करत आपले इरादे स्पष्ट केले होते.
शेवटच्या तीन षटकात बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना केवळ अक्षर पटेलला बाद करण्यात यश आले. विराटने १९व्या षटकातील अखेरच्या दोन चेंडूंवर दहा धावा वसूल केल्या. रविचंद्रन अश्विननेही अखेरच्या षटकात एक चौकार व एक षटकार लगावला. भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १८४ धावा केल्या. विराटने नाबाद ६४ धावांची खेळी केली. बांगलादेशसाठी हसन मेहमूदने सर्वाधिक तीन बळी मिळवले. पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात परत आणले. दोलायमान असणाऱ्या सामन्यात शेवटी भारताने पाच धावांनी जिंकला.