टीम इंडियासाठी बांगलादेशविरुद्धचा सामना फार महत्वाचा असेल. कारण यापूर्वी त्यांना एक पराभवाचा धक्का बसला आहे, त्यामुळे या सामन्यातही भारताचा पराभव झाला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात येणार आहेत. दोन्ही संघ हा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हलमध्ये खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे हा सामना जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे.
भारतीय संघात आज मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. संघ व्यवस्थापनाने देखील याबाबत आधीच संकेत दिले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिक जायबंदी झाल्यामुळे शेवटच्या पाच षटकांसाठी ॠषभ पंत यष्टीरक्षण करण्यासाठी आला होता. त्यामुळे त्याला आज संघात स्थान मिळणार असे दिसत आहे. त्याचबरोबर दीपक हुड्डा मागच्या सामन्यात अपयशी ठरल्याने त्याच्याजागी हर्षल पटेल किंवा एक अष्टपैलू खेळाडूचा विचार केला तर अक्षर पटेल यांचा विचार केला जाऊ शकतो.
टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या म्हणजे सलामीवीर केएल राहुलचा फॉर्म सध्या खराब आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने स्पष्ट केले आहे की या फलंदाजाला पाठिंबा मिळत राहील, याचा अर्थ बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ आपल्या शीर्ष क्रमात कोणताही बदल करणार नाही. म्हणजेच प्लेइंग-११ मध्ये केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार हे वरच्या फळीतील फलंदाज असतील.
हवामान आणि खेळपट्टी
ऑस्ट्रेलियातील हवामान गेल्या काही दिवसांत लहरी झाल्याने इथल्या साऱ्यांची तारांबळ उडाली आहे. टी२० क्रिकेट विश्वचषकासाठी येथे दाखल झालेल्या संघांची अन् यजमान ऑस्ट्रेलिया संघासही या हवामानाचा फटका बसला आहे. अशा वातावरणात आज, बुधवारी भारताचा सामना बांगलादेशशी होत आहे. या लढतीवर पावसाचे सावट आहे. सध्या अॅडलेड शहराचे रुपांतर लंडन शहरात झाल्यासारखा माहोल आहे. पाऊस आणि वाऱ्यामुळे थंडावा आला आहे. अधूनमधून पावसाच्या सरी येण्याची शक्यता असल्याने मैदाने ओलसर राहतील. हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार बुधवारी दुपारी पाऊस विश्रांती घेईल. मात्र, सायंकाळी ६० टक्के पावसाची शक्यता आहे. म्हणूनच सध्या भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या मनात प्रतिस्पर्धी बांगलादेशपेक्षा पावसाबद्दल भीती जास्त आहे. या पावसामुळे भारतीय संघाचे ‘गणित’ बिघडू शकते.
हेही वाचा : संघ व्यवस्थापनचा राहुलला पूर्ण पाठिंबा – द्रविड
अॅडलेडची खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक असून इथे साधारण १७० ते १९० धावसंख्या ही प्रथम फलंदाजी करताना ठीक असेन. पावसामुळे आधीच मैदान ओलसर असल्याने आऊटफिल्ड स्लो आहे. त्यामुळे एकेरीदुहेरी धावसंख्येवर अधिक भर द्यावा लागेल.
सामना कुठे पाहू शकता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर किंवा हॉटस्टार वर दुपारी १.०० वाजता
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
बांगलादेश संघ
शकीब अल हसन (कर्णधार), नुरुल हसन, अफिफ हुसैन, इबादोत हुसेन, हसन महमूद, लिटन दास, मेहिदी हसन मिराझ, मुस्तफिजुर रहमान, नजमुल हुसेन शांतो, शॉरीफुल इस्लाम, सौम्या सरकार, मुसद्देक हुसेन, नसुम अहमद, तस्किन अली अहमद, यासी. चौधरी.