IND vs ENG Hardik Pandya: T20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळला जात आहे. टी २० विश्वचषकाचा अंतिम फेरीचा तिकीट मिळवून देणारा हा सामना असणार आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. के. एल. राहुल, रोहित शर्मा व भारताचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव यांच्या विकेट्स स्वस्तात गमावल्यानंतर सामन्याची धुरा विराट कोहली व हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आली होती. विराट सुरुवातीपासूनच जोरदार फटकेबाजी करत असताना पांड्याला मात्र १५ व्या षटकापर्यंत सूर गवसला नव्हता मात्र त्यानंतर पांड्याची बॅट अशी तळपली की भारताला १६९ धावांचे मोठे लक्ष्य उभे करता आले.
हार्दिक पांड्याने इंग्लड विरुद्ध सामन्यात ३३ चेंडूंमध्ये ६३ धावांची मोठी खेळी खेली. यापूर्वी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याप्रमाणेच विराट- पांड्याची दमदार ६१ धावांची भागीदारी या सामन्यात दिसून आली. पंड्याने उपांत्य फेरीत ४ चौकार व ५ षटकारांचा मारा करत आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या षटकात हार्दिक पांड्याचा फॉर्म पाहता रिषभ पंतने स्वतःची विकेट गमावून त्याला स्ट्राईक मिळवून दिला आणि यानंतर पंड्याने एक षटकार व एक चौकार ठोकून शेवटच्या तीन बॉलमध्ये भारताचा स्कोअर पुढे नेला. शेवटच्या षटकात शेवटच्या बॉलवर पांड्या हिट विकेट आउट झाला.
हार्दिक पंड्याची तुफानी फटकेबाजी
आजच्या सामन्याच्या अगोदरच इरफान पठाण याच्याशी चर्चा करताना पांड्याने आपला आत्मविश्वास बोलून दाखवला होता आणि आज त्याच्या तुफानी खेळीने त्यानेहा विश्वास सार्थ ठरवला आहे.
दुसरीकडे, विराट कोहलीनेही आजच्या सामन्यात आपल्या टी २० करिअरमधील ३७ वे अर्धशतक पूर्ण करत ४००० धावांचा मोठा टप्पा गाठला आहे. आजच्या सामन्यात १२ व्या षटकापर्यंत भारताने केवळ ७५ धावा केल्या असताना शेवटच्या ८ षटकात पंड्याने भारताला मोठा स्कोअर बनवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते.