Shivam Dubey Trolled: टी २० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत काल टीम इंडियाने विजयी पताका रोवली असली तरी भारताच्या एका खेळाडूवर प्रचंड टीका होतेय. “तू फ्रॉड आहेस”,”तुझ्यामुळे रिंकूची संधी गेली”, “भारतीय निवड समितीने याला घेऊन काय जोक केलाय”, अशा विविध टीका करत या खेळाडूला अक्षरशः धारेवर धरलं जात आहे. हा खेळाडू म्हणजे शिवम दुबे. गुरुवारी इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात निराशाजनक कामगिरी केल्याने शिवमला ऑनलाइन क्रूरपणे ट्रोल केले जात आहे. इतक्या महत्त्वाच्या सामन्यात ख्रिस जॉर्डनने शिवमला शून्यावर बाद केले. उपांत्य फेरीत अशी कामगिरी करणं हे क्रिकेटच्या चाहत्यांना काही केल्या पटत नाहीये परिणामी काहींनी मीम्स मधून खिल्ली उडवत तर काहींनी परखड शब्दात टीका करत शिवमला सुनावले आहे.

फक्त भारत विरुद्ध इंग्लंड हा सामनाच नाही तर संपूर्ण टी २० विश्वचषकात शिवम पूर्णपणे फ्लॉप ठरला होता असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात तर मोक्याच्या क्षणी शिवम दुबे पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. जेव्हा रिंकू सिंग, संजू सॅमसनसारख्या खेळाडूंना डावलून शिवम दुबेला संघात स्थान देण्यात आलं तेव्हा तो मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा होती पण उत्तम कामगिरी करण्यात तो सातत्याने अपयशी ठरला.

शिवम दुबे रडारवर, रिंकूच्या चाहत्यांनी सुनावलं

शिवम दुबे आणि रिंकू सिंगचे आयपीएल रेकॉर्ड्स

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दुबेने १४ सामन्यात १६२.२९ च्या सरासरीने ३९६ धावा केल्या होत्या. सुरुवातीला फक्त फलंदाज म्हणून समोर आलेल्या शिवमने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी सुद्धा केली होती ज्यामुळे T20 विश्वचषकाआधी शिवम अष्टपैलू खेळाडू म्हणून एक उत्तम पर्याय म्हणून समोर आला होता.

हे ही वाचा<< “मूर्खासारखं बोलणं थांबवा, तुमचा कचरा..”, हरभजन भडकला; IND vs ENG सामन्याचा निकाल लागताच कुणासाठी केली पोस्ट?

दुसरीकडे, रिंकू सिंगला भारताच्या विश्वचषकाच्या संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळाले असले तरी प्लेइंग ११ मध्ये जागा मिळाली नाहीच. केकेआरच्या स्टारने ११ T20 सामन्यांमध्ये १७६.२३ च्या स्ट्राइक रेटने ३५६ धावा केल्या आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड हायलाईट्स (IND vs ENG, T20 World Cup 2024)

इंग्लंडने काल नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसाने व्यत्यय आणला असला तरी मॅच पुन्हा सुरु झाल्यावर टीम इंडियाला चांगली लय गवसली. रोहितने ३९ चेंडूत ५७, सूर्याने ३६ चेंडूत ४७, हार्दिक पंड्या (१३ चेंडूत २३) आणि रवींद्र जडेजा (९ चेंडूत १७) आणि अखेरीस अक्षर पटेलने सुद्धा १० धावांची जोड करत टीम इंडियाची धावसंख्या १७१ वर नेऊन ठेवली. याशिवाय विराट कोहलीला ९, ऋषभ पंतला ४ तर अर्शदीप सिंगने १ धाव पूर्ण करता आली होती. शिवम दुबे मात्र वर म्हटल्याप्रमाणे भोपळाही न फोडता माघारी परतला होता. गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमच्या पीचवरील साधारण सरासरी धावसंख्या १६७ पर्यंतच आहे अशावेळी भारतीय संघाने मारलेली १७१ धावांची मजल ही उत्तम खेळीचे प्रदर्शन म्हणता येईल.