IND vs ENG: टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाला आहे. बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघाने १० गडी राखून टीम इंडियाला पराभूत केले आहे. जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी 80 व 86 धावांवर नाबाद राहून भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. आजच्या पराभवासह रोहित शर्माची टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर पडली आहे. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंकडून ताणतणावात अनेक चुका झाल्या ज्यामुळे इंग्लंडला निश्चितच त्याचा फायदा झाला पण यातही मोहम्मद शमीच्या एका चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंग्लंडच्या डावाच्या नवव्या षटकात मोहम्मद शमीने गोंधळ घातल्याने भारतीय कर्णधार रोहित शर्माही मैदानातच भडकलेला दिसला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, नवव्या षटकात फाइन लेगवर असलेल्या शमीने थर्ड मॅनमधून धाव घेत भुवनेश्वर कुमारकडे चेंडू देण्याचा प्रयत्न केला. मात्र शमीचा थ्रो भुवनेश्वरच्या डोक्यावरून गेला यामुळेच बटलर आणि हेल्सने दोन अतिरिक्त धावा केल्या. भारताची परिस्थिती अगोदरच बिकट असताना शमी सारख्या अनुभवी खेळाडूने केलेल्या या फिल्डिंगच्या चुकीमुळे कर्णधार रोहित शर्मा नाराज झाला होता.
मोहम्मद शमीवर भडकला रोहित शर्मा
IND vs ENG हायलाईट्स
इंग्लंडने आज नाणेफेक जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. उत्तम पीच असूनही भारताची सुरुवात वाईट झाली. के. एल राहुल केवळ पाच धावा काढून माघारी परतला. रोहित शर्मा २७ तर सूर्यकुमार यादव १४ धावा करून बाद झाले विराट कोहलीने अर्धशतक पूर्ण केल्यावर भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या मात्र अर्धशतक पूर्ण होताच कोहलीची बाद झाला. यानंतर पंड्याने भारताची बाजू सावरून धरली ६३ धावांसह पांड्याने भारताला १६९ धावांचे लक्ष्य उभे करण्यास मदत केली. मात्र जोस बटलर व अॅलेक्स समोर भारतीय गोलंदाज एकही विकेट घेऊ शकले नाही.
दरम्यान, पाच सामन्यांत चार विजय मिळवून गट २ मध्ये अव्वल स्थानी असलेला भारत २०१३ च्या चॅम्पियन ट्रॉफी विजयानंतर पहिल्या जागतिक विजेतेपदाच्या शोधात आहे. त्यांनी २००७ मध्ये पहिला T20 विश्वचषक जिंकला होता.