IND vs ENG Semi Final 2 Updates: टी-२० विश्वचषक २०२४ मधील दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंडमध्ये खेळवला जात आहे. पावसामुळे सामन्याची नाणेफेक उशिरा झाली असून इंग्लिश संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. पण तत्पूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांची यंदाच्या विश्वचषकातील कामगिरीत वेगळाच योगायोग पाहायला मिळत आहे, या दोघांची आकडेवारी अगदी प्रत्येक आकड्यासह सारखीचं आहे.

माजी इंग्लिश क्रिकेटर मायकेल वॉनने क्रिकबझचा हवाला देत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) डेटाशीट शेअर केली आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि जोस बटलरची यंदाच्या टी-२० विश्वचषकातील कामगिरी माहिती देण्यात आली आहे. परंतु संपूर्ण डेटा अगदी सारखाच आहे. आकडेवारीनुसार, या विश्वचषकात दोन्ही कर्णधारांनी बरोबर १२० चेंडूत आतापर्यंत १९१ धावा केल्या आहेत. यासोबतच दोघांचा स्ट्राइक रेटही १५९.१६ आहे.

रोहित आणि बटलर यांच्यातील आकडेवारी यंदाच्या विश्वचषकातील अगदी सारखीच आहे. त्यानुसार या दोन्ही कर्णधारांनी आतापर्यंत (उपांत्य फेरीपूर्वी) १९१ धावा केल्या आहेत. दोघांनीही १२० चेंडूंचा सामना केला आहे. दोघांचा स्ट्राइक-रेट १५९.१६ असा अगदी समान आहे. दोघांनीही यावर्षी समान (९) सामने खेळले आहेत. दोघांनीही १९२ इतक्या सारख्याच चेंडूंचा सामना केला आहे. दोघेही प्रत्येकी दोनदा नाबाद राहिले आहेत, त्यामुळे दोघांनी प्रत्येकी दोनच अर्धशतके केली आहेत.

रोहित शर्मा आणि जोस बटलर यांच्या कामगिरीमधील आकडेवारी पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. दोन फलंदाजांच्या आकडेवारीतील असं साम्य फारच क्वचित पाहायला मिळतं. अजून एक गोष्ट म्हणजे रोहित शर्मा आणि जोस बटलर हे दोघेही संघाचे कर्णधार आहेत. अजून एक साम्य म्हणजे दोघेही आपपल्या संघाकडून सलामीसाठी उतरतात. दोघेही फलंदाज विस्फोटक खेळी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहेत, या दोघांची बॅट तळपली तर संघ मोठी धावसंख्या रचणार याबाबत काही शंका नसते.