IND vs ENG, Semifinal : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य संघ उपांत्य फेरीआधीच गारद झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारत, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे. यापैकी पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानवर मात केली असून स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर आज (२७ जून) रात्री भारत आणि इंग्लंडच्या संघात दुसरा उपांत्य सामना खेळवला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील भारताचा अखेरचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात खेळवण्यात आला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात अवख्या ४१ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ९२ धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या कर्णधार रोहित शर्माचं कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्पर्धेबाहेर काढण्यात रोहितची महत्त्वाची भूमिका आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर रोहितने यावर एक गंमतीदार प्रतिक्रिया दिली आहे.

उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला सामोरा गेला. यावेळी रोहितला प्रश्न विचारण्यात आला की ऑस्ट्रेलियाविरोधात मिळवलेल्या विजयामधील भारतीय संघाची आणि फलंदाज म्हणून तुझी सर्वात मोठी उपलब्ध कोणती होती असं तुला वाटतं? या प्रश्नावर रोहितने अतिशय गंमतीदार उत्तर दिलं. रोहित म्हणाला, ऑस्ट्रेलियाचा संघ आता या स्पर्धेत नाही ही मोठी उपलब्धी आहे.

हे ही वाचा >> “तुझ्यामुळे आम्हालाही…”, वॉर्नरच्या निवृत्तीनंतर पत्नी कँडिसची भावनिक पोस्ट; विक्रमांची यादी शेअर करत म्हणाली…

टी-२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर ८ फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सोमवारी (२४ जून) सामना खेळवण्यात आला होता. आधी कर्णधार रोहित शर्माच्या झंझावाती खेळीनंतर भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या सुपर ८ मधील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव करत सुपर ८ टप्प्यातील तिन्ही सामने भारताने जिंकले. या विजयासह भारताने उपांत्य फेरी गाठली. सुपर ८ चे सर्व तीन सामने जिंकून भारताने सहा गुणांसह अव्वल स्थान पटकावलं. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माच्या ९२ धावांच्या खेळीच्या जोरावर भारताने कांगारूंना २०६ धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने सलामीवीर ट्रॅव्हिस हेडचे अर्धशतक (४३ चेंडूत नऊ चौकार, चार षटकारासह ७८ धावा) आणि कर्णधार मिचेल मार्शच्या (३७) उत्कृष्ट खेळींच्या जोरावर १८१ धावांपर्यंत मजल मारली. मात्र ते ऑस्ट्रेलिय संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng semi final rohit sharma happy there is no australian team in t20 world cup 2024 asc