Jasprit Bumrah breaks Bhuvneshwar’s record : टी-२० विश्वचषक २०२४ चा आठवा सामना भारत आणि आयर्लंड यांच्यात न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात टीम इंडिया प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो भारताच्या वेगवान गोलंदाजांनी योग्य ठरवला. या सामन्यात स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या स्पर्धेची सुरुवात चांगली केली आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एक षटक टाकताच त्याने इतिहास रचला. त्याचबरोबर अर्शदीप सिंगने बुमराहला मागे टाकत एक विक्रम आपल्या नावावर केला.
जसप्रीत बुमराहने रचला इतिहास –
जसप्रीत बुमराहने टी-२० विश्वचषक २०२४ ची सुरुवात मेडन ओव्हरने केली आहे. या सामन्यात त्याने डावातील सहावे षटक निर्धाव म्हणून टाकले. जसप्रीत बुमराहचे हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ११ वे निर्धाव षटक आहे. यासह तो कसोटी खेळणाऱ्या देशाच्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. भुवनेश्वर कुमारने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १० निर्धाव षटके टाकली होती. मात्र जसप्रीत बुमराह आता त्याच्याही पुढे गेला आहे.
अर्शदीप सिंगने धमाकेदार सुरुवात करत मोडला बुमराहचा विक्रम –
गेल्या टी-२० विश्वचषकात चमकदार कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंगने यावेळीही चांगली सुरुवात केली आहे. पॉवरप्लेमधील एकाच षटकात त्याने २ विकेट्स घेतल्या. यासह, तो टी-२०आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे. जसप्रीत बुमराहच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय पॉवरप्लेमध्ये २५ विकेट्स आहेत. याचबरोबर अर्शदीप सिंगने पॉवरप्लेमध्ये २६ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत भुवनेश्वर कुमार ४७ विकेटसह आघाडीवर आहे.
हेही वाचा – IND vs PAK सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “न्यूयॉर्कमध्ये जिंकायचं असेल तर…”
टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज :
४७ विकेट्स – भुवनेश्वर कुमार
२६ विकेट्स – अर्शदीप सिंग<br>२५ विकेट्स – जसप्रीत बुमराह
आयर्लंडचा संघ ९६ धावांत सर्वबाद झाला –
अर्शदीप सिंगने १६व्या षटकात १७ धावा दिल्या आणि शेवटची विकेट धावबादच्या रूपात घेतली. अशाप्रकारे आयरिश संघ ९६ धावांत सर्वबाद झाला. आयर्लंडच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. सातव्या क्रमांकावर आलेल्या गॅरेथ डेलेनीने सर्वाधिक २६ धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.