टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील सामना आज भारत विरुद्ध नेदरलँड्स संघात खेळला गेला. सिडनी येथे झालेल्या सामन्यात भारताने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २ बाद १७९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात नेदरलँड्स ९ बाद १२३ धावाच करु शकला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतके केली. ज्यामध्ये सूर्यकुमार यादवने अर्धशतकाबरोबरच एक विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे.
सूर्यकुमार यादवने २५ चेंडूचा सामना करताना ५१ धावा केल्या ज्यामध्ये त्याने ७ चौकार आणि १ षटकार ठोकला. ज्यामुळे तो एकाच वर्षात दोनशेपेक्षा अधिक स्ट्राइक-रेटने पाचवेळा पन्नास किंवा त्यापेक्षा धावा नोंदवणारा सूर्यकुमार यादव हा टी-२० आंतरराष्ट्रीयक्रिकेटमधील पहिला खेळाडू ठरला आहे.
या वर्षात सर्वात प्रथम वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना सूर्यकुमारने पहिले अर्धशतक नोंदवले होते, ज्यामध्ये त्याने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५५ चेंडूत ११७, हॉकॉंगविरुद्ध २६ चेंडूत नाबाद ६८, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २२ चेंडूत ६१ आणि आज नेदरलँड्सविरुद्ध २५ चेंडू ५१ धावा केल्या.