टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील सुपर १२ च्या आपल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी मात करुन दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करत उपांत्य फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला. विशेष म्हणजे नेदरलँड्सने सुपर-१२ फेरीमधील सर्वात मोठा धक्का आपल्या शेवटच्या सामन्यामध्ये दिला. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याने भारत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला होता. फक्त भारत दुसऱ्या स्थानी असेल की पहिल्या हे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून होतं. भारताने दुसऱ्या गटात पहिलं स्थान कायम राखल्यामुळे आता दुसऱ्या गटामधून भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. पाकिस्तानने ‘सुपर १२’ मधील आपल्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशवर गडी पाच राखून विजय मिळवला. क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे पुढील रविवारी कदाचित भारत विरुद्ध पाकिस्तान अशी ड्रीम फायनल्स पाहण्याची संधी मिळू शकते. नेमका भारत आणि पाकिस्तान टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आमने-सामने कसे येऊ शकतात आणि आकडेवारी काय सांगते पाहूयात…
नक्की वाचा >> World Cup 2022: “…तोच संघ वर्ल्डकप जिंकेल”; भारतीय संघाचा उल्लेख करत Semi-Finals आधी स्टुअर्ट ब्रॉडचं सूचक विधान
उपांत्य फेरीसाठी कोण कोण ठरलं पात्र
उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या संघांमध्ये सर्वात आधी न्यूझीलंड, नंतर इंग्लंडचा क्रमांक लागतो. हे दोन्ही संघ पहिल्या गटामधून अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर पात्र ठरले. सुपर १२ च्या सामन्याच्या अंतिम दिवशी म्हणजेच आज नेदरलँड्समुळे भारत दुसऱ्या गटातून पात्र ठरणार पहिला संघ ठरला तर पाकिस्तानने बांगलादेशला धूळ चारत उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे आयसीसीच्या नियोजनानुसार पहिल्या गटातील अव्वल संघ दुसऱ्या गटातील दुसऱ्या क्रमाकांच्या संघाविरुद्ध सामना खेळणार आहे. तर दुसऱ्या गटातील अव्वल संघ पहिल्या गटातील दुसऱ्या क्रमांकावर पात्र झालेल्या संघाविरुद्ध सामना खेळणार आहे.
नक्की वाचा >> World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्याआधीच भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश; नेदरलँड्सनं जाताजाता दिलं ‘गिफ्ट’
उपांत्य फेरीचे सामने कोणाविरुद्ध कोण खेळणार
पहिल्या गटातील पहिला संघ असणारा न्यूझीलंड दुसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानावर पात्र ठरलेल्या पाकिस्तानविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. हा सामना ९ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. तर दुसऱ्या गटातील पहिला संघ म्हणजेच भारताचा सामना पहिल्या गटामधून दुसऱ्या स्थानी असलेल्या इंग्लंडविरोधात होणार आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये उपांत्य फेरीचा सामना १० तारखेला अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाईल.
भारत विरुद्ध इंग्लंडची आकडेवारी काय सांगते? कोणाचं पारडं जड?
भारत आणि इंग्लंडच्या संघादरम्यान टी-२० चे २२ सामने झाले असून त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक सामने भारताने जिंकले आहेत. इंग्लंड आणि भारतादरम्यान झालेल्या तीन टी-२० विश्वचषक सामन्यांपैकी एकामध्ये इंग्लडने विजय मिळवला असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता या वर्षीच्या टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीमध्ये भारत आपलं वर्चस्व कायम राखणार की इंग्लंड भारताला धक्का देणार हे या आठवड्यात स्पष्ट होईल. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल.
नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण
न्यूझीलंड पाकिस्तानमध्ये सरस कोण?
न्यूझीलंड आणि पाकिस्तान टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत २८ वेळा आमने-सामने आले आहेत. विशेष म्हणजे यापैकी ५० टक्क्यांहून अधिक वेळा पाकिस्तानने बाजी मारली आहे. पाकिस्तानने तब्बल १७ वेळा न्यूझीलंडला पराभूत केलं आहे. तर ११ वेळा न्यूझीलंडने पाकिस्तानवर मात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं पारडं याबाबतीत जड दिसत आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धांमधेही पाकिस्तानचं पारडं न्यूझीलंडपेक्षा जड दिसत आहे. आतापर्यंत हे दोन्ही संघ सहा वेळा टी-२० विश्वचषक स्पर्धांमध्ये आमने-सामने आले असून यापैकी केवळ दोनदा न्यूझीलंडला यश मिळालं आहे. तर चारवेळा पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केलं आहे.
नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय
भारत पाकिस्तान सामन्याची शक्यता किती?
वरील सर्व आकडेमोड पाहता भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीमध्ये प्रतिस्पर्धी संघांविरोधातील आपला रेकॉर्ड कायम ठेवत विजय मिळवल्यास हे कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात आमने-सामने दिसतील. इंग्लंडला पराभूत करुन भारत तर न्यूझीलंडला पराभूत करुन पाकिस्तान अंतिम फेरीत धडक मारु शकतात. अंतिम सामना हा १३ नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यामुळे हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी अंतिम सामन्यात आमने-सामने आल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही.
यापूर्वीही झालेला भारत-पाकिस्तान टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना
यापूर्वी २००७ साली भारत विरुद्ध पाकिस्तान असा अंतिम सामना टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच पर्वात झाला होता. त्यावेळी भारताने पाकिस्तानवर मात केली होती. यंदाच्या स्पर्धेमध्ये सुपर १२ च्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानवर अगदी शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला होता. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तान संघातील टी-२० सामन्यांच्या आकडेवारीचा विचार केल्यास भारताचं पारडं जड दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानने टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण सात सामने खेळले असून सातपैकी सहा सामन्यांमध्ये भारत विजयी ठरला आहे. पाकिस्तानला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आकडेवारीनुसार पाठबळ असलं तरी या सामन्याचा दोन्ही संघांवर प्रचंड ताण असेल यात शंकाच नाही.
नक्की वाचा >> Ind vs Ban: याला म्हणतात Sportsmanship… भारताच्या विजयानंतर विराट डायनिंग हॉलमध्ये बसलेल्या लिटन दास जवळ गेला अन्…
कोहली फॅक्टर
भारत पाकिस्तान सामना झाला तर सर्वात सकारात्मक बाब म्हणजे विराट कोहली फॅक्टर. पाकिस्तानविरुद्धच्या सर्वच टी-२० विश्वचषक सामन्यांमध्ये कोहलीने तुफान फटकेबाजी केली आहे. कोहली कधीच पाकिस्तानविरुद्ध विश्वचषक सामन्यांमध्ये अपयशी ठरलेला नाही. त्यामुळेच अंतिम सामना पाकिस्तानविरुद्ध झाल्यास कोहलीवर सर्वच क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील.