IND vs PAK Highlight Virat Kohli Last Over: ऑस्ट्रेलियातून टीम इंडियाने कोट्यवधी भारतीयांसाठी दिवाळीची भेट पाठवली आहे. मेलबर्न येथे आज भारत विरुद्ध पाकिस्तानचा अभूतपूर्व सामना रंगला. विराट कोहलीच्या बॅटने धावांची आतिषबाजी करून टीम इंडियाला मोठा आणि महत्त्वाचा विजय मिळवून दिला आहे. ३१ धावांवर चार गडी बाद असताना विराटने सामना शेवटपर्यंत खेचून आणला. शेवटच्या षटकात पाकिस्तानच्या तोंडचा घास पळवताना विराट कोहलीने हुशारीने दाखवलेला खेळ पाहून टीकाकारांना चपराक बसली आहे. अवघ्या ६ बॉल मध्ये १६ धावा गरजेच्या असताना विराटने केलेली कमाल जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या सदैव लक्षात राहणारी असेल. ऐतिहासिक भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शेवटचे षटक कसे रंगले याची एक झलक आपण पाहुयात..
पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाझ याच्यावर शेवटच्या षटकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नवाझने टीमचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच बॉलवर हार्दिक पांड्याची मोठी विकेट घेऊन टीम इंडियाला महत्त्वाच्या क्षणी धक्का दिला. पण यानंतरचे एकूण एक प्रयोग पाकिस्तानला पराभवाकडे घेऊन जाणारे ठरले.
पहिल्या बॉल वर पांड्या आउट होताच दिनेश कार्तिक मैदानात आला नवाझच्या दुसऱ्या बॉलवर एक धाव काढून पुन्हा विराटकडे स्ट्राईक दिली. तिसऱ्या चेंडूवर विराटने दोन धावा काढल्या. यानंतर चौथा बॉल हा नो बॉल ठरला पण यावरही विराटने षटकार ठोकून टीम इंडियाला विजयीपाथवर आणले. नो बॉलनंतर पुढच्या बॉलवर विराट क्लीन बोल्ड झाला होता मात्र फ्री हिट असल्यामुळे त्याचा बचाव झाला. पण यावेळी त्याने तीन महत्त्वाच्या धावा (बाईज) घेतल्या.
विराटच्या या स्मार्ट खेळानंतर पुढच्या बॉलवर दिनेश कार्तिक क्लीन बोल्ड झाला व आर. आश्विन स्ट्राईकवर आला. यानंतर पुन्हा नवाझकडून एक वाइड बॉल टाकण्यात आला आणि अखेरीस १ बॉल वर १ अशी स्थिती असताना आर आश्विनने विजयी धाव घेऊन टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
दरम्यान, पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी ४ धावा करून माघारी परतले. विराट कोहलीने आजच्या पूर्ण सामन्यात नाबाद ८२ धावांची खेळी खेळली. यामध्ये ४ षटकार आणि ६ चौकार समाविष्ट आहेत. विराटनं बँकफूटवरून पंचवर मारलेला षटकार व अगदी अटीतटीच्या शेवटच्या षटकात दाखवलेली हुशारी भारताच्या विजयाचे कारण ठरली.