टी-२० विश्वचषक २०२४ पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सामन्याची पर्वणी घेऊन आला आहे. आज ९ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून न्यूयॉर्कमध्ये ही हायव्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान संघाला जीव ओतून खेळण्याचे आवाहन करत भारताविरूद्ध विजय मिळवण्याची गळ घातली आहे. खुदा का वास्ता असं म्हणत चांगले खेळण्याचा संदेश देताना अख्तरने एक व्हीडिओ त्याच्या एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे.
पाकिस्तान संघाचा भारताविरूद्धचा रेकॉर्ड फारच वाईट आहे. भारत पाकिस्तानमधील आतापर्यंत झालेल्या ७ लढतीत भारताने ६ लढती जिंकल्या आहेत. सोबतच यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानची सुरूवात ही धक्कादायक झाली. अमेरिकेच्या नवख्या संघाने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. त्यामुळे या मोठ्या पराभवानंतर आणि सुमार कामगिरीनंतर पाकिस्तानला मोठ्या इच्छाशक्तीनिशी मैदानात उतरावे लागणार आहे.
हेही वाचा – बाबर आझमला इंग्रजीत विचारलेला प्रश्नच कळला नाही, पाकिस्तानच्या कर्णधाराचं उत्तर ऐकाल तर… VIDEO व्हायरल
भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी शोएब अख्तरने व्हीडिओ शेअर करत पाकिस्तान संघाला काय संदेश दिला आहे पाहा, अख्तर म्हणतो- “पाकिस्तान संघासाठी खेळा, तुम्हाला खुदा का वास्ता. आज स्वत:साठी नाही देशासाठी खेळा. जीव ओतून खेळा, वैयक्तिक रेकॉर्डवर लक्ष ठेवू नका. लोक वैयक्तिक रेकॉर्ड लक्षात ठेवत नाहीत. जावेद भाईचा षटकार लोकांच्या लक्षात आहे, माझी कोलकातामधील विकेट लक्षात राहिली, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २००९ चा वर्ल्डकप लक्षात आहे. लोक वैयक्तिक रेकॉर्ड नाही, तर पाकिस्तान संघाचा निकाल लक्षात ठेवतात. आज एकमेकांसाठी खेळा, पाकिस्तानसाठी खेळा…संपूर्ण देशाचे लक्ष तुमच्याकडे आहे.”
Pakistan, play out of your skin. Play for Pakistan. Don't play for individual records. #INDvPAK pic.twitter.com/X1627TyiBd
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) June 9, 2024
भारतीय संघाने वर्ल्डकपमधील आयर्लंडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात एक शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने नासाऊ काऊंटी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात आयर्लंडला ९६ धावांवर रोखत रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर एक शानदार विजय मिळवला. त्यामुले भारतीय संघ सध्या चांगल्या लयीत आहे. तर पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेल्या धक्कादायक पराभवानंतर मनोबल उंचावत आजच्या सामन्यात उतरावे लागणार आहे.