आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२च्या टप्प्यातील चौथा सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा माजी सलामीवीर आणि क्रिकेट तज्ञ आकाश चोप्राने आपली प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. आकाशच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळाली आहे, ते जाणून घेणार आहोत.
आकाश चोप्राच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या नावाचा समावेश नाही. दिनेश कार्तिक सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून कर्णधार रोहित शर्मासह संघ व्यवस्थापन पंतच्या फिनिशरची क्षमता लक्षात घेऊन त्याला संधी देत आहे. अशा परिस्थितीत पंतचे संघात स्थान निर्माण होत नाही. याशिवाय आकाशने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंचा समावेश केला आहे.
आकाश चोप्राच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टॉप ६ मध्ये सर्व समान खेळाडू आहेत, ज्यांची इतर क्रिकेट पंडितांनी निवड केली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करतील, तर विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव मधल्या फळीची जबाबदारी सांभाळतील. याशिवाय हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावर आणि दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे.
आकाशने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल या दोन फिरकी गोलंदाजांची निवड केली आहे. अक्षर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करून रवींद्र जडेजाची पोकळी भरून काढेल. प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताना आकाशने चहलच्या नावापुढे अश्विनचे नावही लिहिले आहे. पाकिस्तानविरुद्ध चहलच्या जागी अश्विनही खेळू शकतो, असे त्याचे म्हणणे आहे.
त्याचबरोबर या माजी खेळाडूने तीन वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमी, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग यांची निवड केली आहे. आकाशने येथे शमीच्या नावासमोर भुवीचे नावही लिहिले आहे. म्हणजेच आकाशच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग खेळणार आहेत.
आकाश चोप्राची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.