IND vs PAK ICC T20 World Cup 2024 : जगभरातील क्रिकेटरसिकांना ज्या सामन्याची नेहमी प्रतीक्षा असते तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सध्या अमेरिकेत खेळवला जात आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आज (९ जून) न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. या हाय व्होल्टेज सामन्यात क्रिकेटरसिक भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत होते. मात्र या सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय फलंदाजांची हाराकिरी पाहायला मिळाली. या सामन्यात भारतीय फलंदाज निर्धारित २० षटकंदेखील खेळू शकले नाहीत. भारताचे सर्व फलंदाज १९ षटकात ११९ धावा करून बाद झाले. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात अपयशी ठरला.

विराट कोहली आणि रोहित शर्माची सलामीची जोडी या सामन्यात फ्लॉप ठरली. कोहली पहिल्यांदाच पाकिस्तानविरोधात मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. मात्र रोहितची पाकिस्तानविरोधातील हाराकिरी चालूच आहे. रोहितने आज पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटरसिकांचं मन मोडलं. रोहितचा फ्लॉप शो न्यूयॉर्कमध्येही कायम राहिला आहे.

पावसामुळे उशिरा सुरू झालेल्या न्यूयॉर्कच्या या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकल्याचं पाहायला मिळालं. सलामीला आलेला विराट कोहली ४ धावांवर तर कर्णधार रोहित शर्मा १३ धावांवर बाद झाला. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात अर्थशतक ठोकणाऱ्या रोहितकडून आज खूप अपेक्षा होत्या. मात्र रोहित लवकर बाद झाला. भारताचा सेनापती तिसऱ्याच षटकात पव्हेलियनमध्ये परतला.

गेल्या काही वर्षांमध्ये टी-२० क्रिकेट असो अथवा टी-२० वर्ल्डकप, रोहित शर्मा पाकिस्तानविरोधात धावा जमवण्यात अपयशी ठरला आहे. त्याने पाकिस्तानविरोधात आजवर एकही शतक किंवा अर्धशतक झळकावलेलं नाही. ३० ही त्याची पाकिस्तानविरोधातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. याआधीच्या पाच टी-२० विश्वचषकांमध्ये रोहितने पाकिस्तानविरोधात केवळ ६८ धावा केल्या आहेत. आज त्याने १३ धावांची खेळी केली. म्हणजेच सहा सामन्यात त्याने पाकिस्तानविरोधात केवळ ८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी केवळ १४.११ ची तर स्ट्राईक रेट ११७.५९ चा राहिला आहे. तर टी-२० क्रिकेटच्या इतिहासात रोहितने पाकिस्तानविरोधात १० सामन्यांमध्ये १४.२५ च्या सरासरीने ११४ धावा जमवल्या आहेत.

हे ही वाचा >> ndia vs Pakistan, T20 World Cup 2024 : “परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन…”, पाकिस्तानचं ढिसाळ क्षेत्ररक्षण; पंत-अक्षरला तीनवेळा जीवदान, नेटिझन्कडून फिरकी, पाहा VIDEO

पाकिस्तानविरोधातील १० टी-२० सामन्यांमधील रोहितची कामगिरी

३० (१६)

४ (२)*

० (२)

० (१)

२८ (१६)

२ (२)

२४ (२१)

१० (११)

१२ (१८)

४ (७)

१३ (१२)