२२ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघ २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या ब्लॉक-बस्टर लढतीविषयी बोलताना टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की,” माझा शेवटच्या क्षणी निर्णय घेण्यावर विश्वास नाही. निवड केलेल्या खेळाडूंना चांगली तयारी करता यावी यासाठी अंतिम अकराचा संघ आधीच निश्चित करण्यात आला आहे.” विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना हा वर्षानुवर्षे वाट बघणाऱ्या चाहत्यांसाठी नक्कीच एक पर्वणी ठरणार आहे. हे कट्टर प्रतिस्पर्धी मेलबर्न सारख्या प्रतिष्ठीत स्टेडियमवर भिडणार आहेत. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशसोबत सुपर-१२ च्या दुसऱ्या गटात आहेत. तर पात्रता फेरीतून येणारे दोन संघ या गटात पुढे सामील होतील.

भारत- पाकिस्तान सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने आपले विचार व्यक्त केले आहेत. त्यात तो म्हणतो, “माझा शेवटच्या क्षणी घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर विश्वास नाही. सामन्याच्या आधी तयारी करण्याच्या दृष्टीने खेळाडूंना त्यांच्या निवडीबाबत माहिती असणे आवश्यक आहे. पाकिस्तान विरुद्धच्या अंतिम अकरा खेळाडूंची यादी माझ्याकडे तयार आहे. शेवटच्या क्षणी तयारी सुरु करण्यावर माझा विश्वास नाही. आम्हाला प्रत्येकाला भारत वि. पाकिस्तान सामन्याचे महत्व कळते पण प्रत्येक वेळी ती एकच चर्चा करत राहण्यात काही अर्थ नाही. मागच्यावेळी आशिया चषकादरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंना भेटलो असता आम्ही कुटुंबातील आणि इतर काही साधारण गोष्टींवर गप्पा मारल्या.”

सूर्यकुमार यादव मोहम्मद शमी यांच्याबाबत रोहितने केलेले विधान चर्चेचे ठरले. रोहितच्या मते सूर्याकुमार भारतीय संघाचा X फॅक्टर आहे आणि रविवारी होणाऱ्या सराव सत्रात शमीची गोलंदाजी कशी होते, हे पाहणार असल्याचेही त्याने म्हटले. पण, त्याचवेळी रोहितने जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबाबत जे मत व्यक्त केले त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेत जसप्रीतला खेळवण्याची घाई केली आणि त्याच्या पाठीच्या दुखापतीनं डोकं वर काढलं. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया व आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेनंतर वर्ल्ड कप मधूनही माघार घ्यावी लागली.

मोहम्मद शमी बाबत बोलताना कर्णधार रोहित म्हणाला की,”मोहम्मद शमीला अद्याप मी भेटलेलो नाही, पंरतु जे काही मी ऐकलं आहे, त्यावरून तो तंदुरुस्त आहे असे मला समजते. एनसीए मध्ये त्याने भरपूर मेहनत घेतली आहे. रविवारी ब्रिस्बेन येथे सराव सत्र आहे आणि त्यात शमी कशी गोलंदाजी करतो हे पाहिल्यानंतर पुढचा निर्णय घेईन. टी२० क्रिकेटमध्ये निडर खेळ करण्याचा पवित्रा आम्ही स्वीकारला आहे. १४० धावांचे लक्ष्य असेल तर ते १४-१५ षटकांतच पार करण्याचे आमचे ध्येय असेल.”

हेही वाचा :  Women’s T20 Asia Cup: जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणारी टीम इंडिया सातव्यांदा आशिया चषक जिंकण्यासाठी सज्ज 

क्रिकेट टी२० विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी होणारा हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला जाईल, जेथे स्टेडियममध्ये सुमारे १ लाख प्रेक्षक उपस्थित असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामना सुरू होईल.

Story img Loader