विराट कोहली जगातील सर्वोत्तम फिनीशरमध्ये का गणला जातो याचा प्रत्यय भारतीयच नाही तर पाकिस्तानी चाहत्यांनाही रविवारी आला. भारताच्या या माजी कर्णधाराने अशक्य वाटणारा विजय संघाला मिळवून देत आपल्या पारंपारिक प्रतिस्पर्धाला मात देण्यात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाचे सलामीवीर आणि मधली फळी ज्या खेळपट्टीवर कोलमडून पडली त्याच खेळपट्टीवर हार्दीक पंड्याच्या सहाय्याने विराटने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताला विजय मिळून देत खऱ्या अर्थाने दिवाळी भेट दिली.
नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू
विराटच्या या खेळीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. कर्णधार रोहित शर्मा, सचिन तेंडूलकरसहीत अनेकांनी विराटची ही टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळी असल्याचं म्हटलं आहे. सोशल मीडियावर विराटचीच चर्चा आहे. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला. या विजयानंतर विराटची पत्नी अनुष्कानेही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
“काय सुंदर खेळलास. आज तू लोकांच्या आयुष्यात इतका आनंद आणलास आणि तो ही दिवाळीच्या दिवशी. तू फार फार सुंदर आहेस. तुझी इच्छाशक्ती, ध्येयवाद आणि खेळी खरोखरच आश्चर्यचकित करणारी आहे. मी आताच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्रिकेट सामना पाहिला. आपली मुलगी अजून लहान आहे त्यामुळेच तिला तिची आई घरभर का नाचत आहे, ओरडत आहे हे समजलं नसेल. एक दिवस तिला कळेल की तिच्या वडिलांनी आजच त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी केली होती. ही खेळी त्याने अशा वेळी केली जेव्हा तो एका कठीण काळातून गेला आणि अधिक समजदार आणि सक्षम बनून त्यातून बाहेर पडला. मला तुझा फार अभिमान आहे. तुझ्यातील इच्छाशक्ती ही संसर्गजन्य आहे. तुझ्या या दृष्टीकोनाला मर्यादा नाहीत. काहीही झालं तरी माझं तुझ्यावर कायमच प्रेम असणार आहे,” असं अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
नक्की वाचा >> Ind vs Pak: थरार विजय मिळवून दिल्यानंतर विराटचा अनुष्काला कॉल; म्हणाला, “तिने एकच गोष्ट सांगितली की, इथे लोक मला…”
मुलीच्या फोटोसहीत टीव्हीवर सामना पाहतानाचे फोटो अनुष्काने या पोस्टमध्ये शेअर केले आहेत. अनुष्काच्या या पोस्टला ४७ लाखांहून अधिक लाइक आहेत. अशातच विराटने रात्री उशीरा हा पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवली आहे. “थॅक यू सो मच माय लव्ह. प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर राहिल्याबद्दल धन्यवाद. मला फार सामधानी असल्यासारखं वाटतंय. लव्ह यू सो मच,” अशी कमेंट विराटने केली आहे. विराटच्या या कमेंटलाही दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
शेवटच्या षटकामधील थरार
विराटने विजय मिळवून दिलेल्या या सामन्यामध्ये भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने पहिल्या चेंडूवर हार्दिकला (३७ चेंडूंत ४० धावा) बाद केले. हार्दिक आणि कोहलीने ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मिळून तीन धावाच निघाल्या. मात्र, नवाजचा पुढील चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. कमरेवरील हा चेंडू कोहलीने सीमारेषेबाहेर पोहोचवला. त्यानंतर नवाजने वाइड चेंडू टाकला. भारताला तीन चेंडूंत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा करता आल्या. पुढील चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. मात्र, त्यानंतर वाइड चेंडू आणि मग अश्विनने एक धाव काढून भारताचा विजय सुनिश्चित केला.